पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी; ज्योतीचा युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित

लेफ्ट जॅब-राइट जॅब़, स्ट्रेट पंच, डकिंग, कॉर्नर हे बॉक्सिंग खेळातील तांत्रिक शब्द रविवारी गुवाहाटी येथील करमबीर नबीन चंद्रा बोडरेलोई स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांच्या तोंडून ऐकू येत होते. आठवडाभर सुरू असलेल्या जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेमुळे ते त्यांच्या परिचयाचे झाले होते. भारतीय खेळाडूंच्या रिंगमधील कौशल्यावर त्यांच्याकडून मिळणारी ही दादच होती. युवा महिला स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना भारताने रविवारी पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी एकंदर ७ पदके पटकावली. नीतू, ज्योती, साक्षी, शशी चोप्रा आणि स्थानिक खेळाडू अंकुशिता बोरो यांनी सुवर्णकमाई केली. त्यात ज्योतीच्या युवा ऑलिम्पिकमधील प्रवेशाच्या वृत्ताने आनंदाला उधाण आले होते. स्थानिक खेळाडू अंकुशिताला स्पर्धेतील सर्वोत्तम बॉक्सिंगपटू म्हणून गौरवण्यात आले.

यजमान म्हणून भारतीय खेळाडूंचे पारडे जड वाटत असले तरी त्यांच्यासमोर रशिया, कझाकस्तान, इंग्लंड व व्हिएतनाम या देशांमधील अव्वल खेळाडूंचे आव्हान होते. साक्षीचा (५४ किलो) सामना वगळला तर भारताच्या अन्य खेळाडूंनी सहज विजय मिळवला. हरयाणाच्या नीतूने ४५-४८ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या झाजीरा उराकवायेव्हावर ५-० असा सहज विजय मिळवला आणि वडिलांनी तिच्यासाठी केलेल्या बलिदानाला ‘सुवर्ण’भेट दिली.  हरयाणाच्या ज्योतीवर ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत रशियन खेळाडूने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलताना ठोशांचा भडिमार केला, परंतु भारतीय खेळाडूने अचूक बचाव केला. त्यानंतर नैसर्गिक खेळ करत ज्योतीने ५-० अशा विजयासह पुढील वर्षी अर्जेटिना येथे होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रताही तिने निश्चित केली.

२००८च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगने दिलेल्या प्रेरणादायी सल्ल्यामुळे साक्षीने सुवर्णपदकाची कमाई केली. इंग्लंडच्या आयव्ही-जेन स्मिथने तिला कडवी टक्कर दिली. सामन्याचा निकाल कोणत्या बाजूने लागेल, याची कुणीच खात्री देऊ शकत नव्हते, इतकी ही लढत चुरशीची झाली; पण पंचांनी साक्षीला ३-२ असे विजयी घोषित केले. पंचांच्या या निर्णयावर इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शशी चोप्राने बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेपाठोपाठ जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. शशीने ५७ किलो वजनी गटात नाजॉक डो हाँगवर ४-१ असा विजय मिळवला. चार तासांपासून प्रेक्षक वाट पाहत असलेल्या अंकुशिता बोरोच्या लढतीदरम्यान स्टेडियमवर एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. ‘इंडिया, इंडिया..’ नाऱ्याची जागा ‘अंकुशिता, अंकुशिता..’ या घोषणांनी घेतली. गुवाहाटीच्या या खेळाडूने सर्वाच्या अपेक्षांची पूर्तता करताना रशियाच्या इकाटेरिना डायनिकवर ४-१ असा विजय मिळवून भारताचा ‘सुवर्णपंच’ साकारला.

शॉर्टसर्किट अन् प्रेक्षकांची पळापळ

पहिली लढत संपल्यानंतर स्टेडियमवर अचानक शॉर्टसर्किटमुळे आतषबाजीसारखा आवाज झाला. या प्रकारामुळे प्रेक्षकांनी स्टेडियमबाहेर पडण्यासाठी पळापळ केली. या घटनेने कोणतीही हानी झाली नसली तरी ५० मिनिटांहून अधिक काळ खेळ थांबवण्यात आला होता.