टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात महिला हॉकी संघाला अपयश आलं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पराभवामुळे महिला हॉकी संघाच्या गोटात निराशेचं वातावरण आहे. भारतीय हॉकी चाहत्यांनाही महिलांच्या या पराभवावर निराशा व्यक्त करतानाच हरकत नाही २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकू असं म्हणत त्यांना सोशल नेटवर्किंगवरुन धीर दिलाय. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनीही ट्विटवरुन या पराभवानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. आम्ही पदक जिंकलो नसलो तरी भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याचा आनंद आहे असं मरिन म्हणालेत.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला धीर देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. रडणं थांबवा असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला. तुम्ही खूप छान खेळलात आणि आम्हाला तुमच्यावर गर्व आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्यांनी महिला हॉकी संघाशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मिनिटं ४८ सेकंद त्यांच्याशी वार्तालाप केला.

 

खेळाडू – नमस्कार सर

पंतप्रधान मोदी- नमस्ते..नमस्ते, तुम्ही सर्व खूप छान खेळलात. तुम्ही इतका घाम गाळलात. गेल्या पाच वर्षापासून सर्व सोडून तुम्ही हीच साधना करत होतात. तुमची मेहनत पदक आणू शकलं नाही. मात्र तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब कोट्यवधी भारतीय महिलांसाठी प्रेरणा आहे. मी संघाच्या सर्व सहकार्यांना आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा देत आहे.

खेळाडू – खुप खूप आभारी सर, तुम्ही इतकी प्रेरणा दिलीत आमच्या संघाला, खूप खूप आभारी आहोत.

पंतप्रधान मोदी- निराश होऊ नका, मी बघतोय, नवनीतच्या डोळ्याला इजा झाली आहे.

खेळाडू – हा तिला काल जखम झाली होती. तिला चार टाके लागले आहेत.

पंतप्रधान मोदी- अरे बापरे!, मी बघत होतो तिला..आता बरी आहे ना..तिच्या डोळ्यांना काही त्रास नाही ना..वंदना वगैरे सर्वजण चांगले खेळले. सलीमा पण चांगली खेळली..तुम्ही रडणं बंद करा..माझ्याकडे आवाज येत आहे. देश तुमच्यावर गर्व करत आहे. निराश होऊ नका. किती दशकानंतर हॉकी, भारताची ओळख, पुन्हा पुनर्जिवीत होत आहे. हे तुमच्या मेहनतीमुळे झाली आहे.

रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.