विश्वचषक हॉकी स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत भारतीय महिला संघ जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य टप्प्यात सहभागी होत आहे. ही स्पर्धा ८ जुलैपासून जोहान्सबर्ग येथे सुरू होत असून आघाडीवीर राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारताचा १८ सदस्यीय संघ शनिवारी नवी दिल्लीहून रवाना होणार आहे.

‘‘गेला आठवडाभर महिला संघ मुलांच्या १८ वर्षांखालील संघाबरोबर सराव सामने खेळत आहे. मुलांचा संघ वेगवान चाली करण्याबाबत तरबेज असल्यामुळेच त्यांच्याबरोबरच्या सरावाचा आमच्या संघाला फायदा होणार आहे. स्पर्धात्मक सरावाबरोबरच आमच्या शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी आम्हाला पाहायला मिळाली,’’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक सोजेर्ड मरिजीन यांनी सांगितले.

संघाचे शास्त्रोक्त प्रशिक्षक सल्लागार वायने लोम्बार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने भरपूर सराव केला. त्यामध्ये वेगवान चाली, शारीरिक क्षमता वाढवणे, शारीरिक तंदुरुस्ती यावर भर देण्यात आला होता.

‘‘दररोज आम्ही चार सत्रांमध्ये सराव करीत होतो. आम्हा मुलींच्या दृष्टीने हा सराव थोडासा आव्हानात्मक होता. तरीही विश्वचषक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर असल्यामुळेच आम्ही अतिशय एकाग्रतेने हा सराव केला. संघातील प्रत्येक खेळाडू विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक आहे. आमच्या संघातील काही खेळाडूंचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही खेळाडूला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळेच आफ्रिकेतील स्पर्धेत क्षमतेच्या शंभर टक्क्यांइतके कौशल्य दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील,’’ असे राणीने सांगितले.

भारतीय संघाला साखळी गटात दक्षिण आफ्रिका, अमेरिका, चिली व अर्जेटिना यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताचा पहिला सामना ८ जुलै रोजी आफ्रिकेशी होणार आहे.