महिलांच्या जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत पदक मिळविण्याच्या आशांवर भारतास पाणी सोडावे लागले. त्यांना सातव्या फेरीत जॉर्जियाने २.५-१.५ अशा गुणांनी हरविले. जॉर्जियाविरुद्धच्या पहिल्या डावात कोनेरू हंपी हिला बेला खोतेनाश्वेली हिच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. द्रोणावली हरिका हिला लैला जावखिश्विली हिच्याविरुद्ध विजयाची संधी साधता आली नाही. तिला हा डाव बरोबरीत ठेवावा लागला. पद्मिनी राऊत हिला मेरी अर्बिझ हिने सहज हरविले. खराब सुरुवातीमुळे पद्मिनी हिने प्रारंभीच डावावरील नियंत्रण गमावले. मेरी हिने त्यानंतर आपला दबाव कायम ठेवीत शानदार विजय मिळविला. चौथ्या डावात सौम्या स्वामीनाथन हिला मेलिया सलोमी हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवण्याची आवश्यकता होती मात्र सलोमी हिने सुरेख खेळ करीत हा डाव जिंकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  
जॉर्जियाने सातव्या फेरीअखेर तेरा गुणांसह सुवर्णपदकासाठी आव्हान राखले आहे. रशियाने ११ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्यांनी कझाकिस्तानविरुद्ध २-२ अशी बरोबरी स्वीकारली. चीनचे नऊ गुण झाले आहेत. भारताने आतापर्यंत केवळ सहा गुणांची कमाई केली आहे.