केपटाऊन : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव लवकरच होणार असला, तरी भारतीय संघाचे पूर्ण लक्ष हे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यावर असेल, असे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले. ‘डब्ल्यूपीएल’ची खेळाडू लिलावप्रक्रिया १३ फेब्रुवारीला मुंबईत होणार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १२ फेब्रुवारीला रंगणार आहे.
‘‘लिलावापूर्वी आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे आणि आमचे लक्ष केवळ या सामन्यावर आहे. आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे ध्येय बाळगले आहे. अन्य गोष्टी सुरूच असतात. मात्र, खेळाडूला काय महत्त्वाचे आहे किंवा काय नाही, याची कल्पना असते. आम्ही खेळाडू म्हणून परिपक्व आहोत. त्यामुळे आम्हाला कशाला अधिक महत्त्व द्यायचे याची जाणीव आहे,’’ असे हरमनप्रीत ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी झालेल्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत म्हणाली.
शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच युवा महिला (१९ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा वरिष्ठ संघाचा प्रयत्न असेल. ‘‘युवा महिला विश्वचषक स्पर्धेतील भारतीय महिला संघाच्या कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आम्हा सर्वासाठी हा क्षण खास होता आणि त्यांच्या यशानंतर अनेक मुली क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहतील,’’ असे हरमनप्रीतने सांगितले.
‘डब्ल्यूपीएल’बद्दल हरमनप्रीत म्हणाली की, ‘‘अनेक वर्षांपासून आम्ही या स्पर्धेची प्रतीक्षा करत होतो. महिला बिग बॅश (ऑस्ट्रेलिया),
‘द हंड्रेड’ (इंग्लंड) या लीगमुळे त्या देशांतील महिला क्रिकेटच्या विकासाला हातभार लागला आहे. आपल्या देशातही असेच होईल असा मला विश्वास आहे.’’