भारताच्या महिला संघाने इतिहास घडवला, ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका विजय

ऑस्ट्रेलियाच्या भूमीत मिळवलेला भारताच्या महिला संघाचा हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे.

Ind vs aus 2nd t20
(getty images)

भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत मालिका विजयाचा इतिहास घडवला. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत २-० अशी धूळ चारून मालिकेवर कब्जा केला.

मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल १० विकेट्सने धूळ चारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी १० षटकांत ६६ धावांचे आव्हान होते. भारताच्या सलामी जोडीने हे आव्हान अवघ्या ९.१ षटकांत पूर्ण केले. कर्णधार मिताली राज हिने ३२ चेंडूत ३७ धावांची तर स्मृती मंधनाने २४ चेंडूत २२ धावांची नाबाद खेळी करून ऐतिहासिक विजय साजरा केला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने १८ षटकांत ८ बाद १२५ धावा केल्या होत्या. भारताकडून झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन, तर पूनम यादव आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian womens cricket team script historic series win in australia