भारतीय महिला क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी यावर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारत एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. क्रिकइन्फोच्या अहवालानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिने याबद्दल संकेत दिले आहेत. सीए लवकरच आपल्या तारखांची घोषणा करू शकते, असे वृत्त आहे.

“सप्टेंबरच्या मध्यात ऑस्ट्रेलिया भारतीय महिला संघाचे यजमानपद भूषविणार आहे. भारतबरोबरच्या मालिकेपूर्वी काही ऑस्ट्रेलियाचा महिला संघ शिबिरांमध्ये भाग घेईल. एक शिबिर डार्विनमध्ये असू शकेल. यानंतर बिग बॅश, एशेस वर्ल्ड आणि कॉमनवेल्थ गेम्स असतील”, असे शटने सांगितले.

हा दौरा मूळतः यावर्षी जानेवारीमध्ये होणार होता, परंतु डिसेंबर २०२०मध्ये हा स्थगित करण्यात आला होता. २०२१-२१हंगामात या तारखांची पुन्हा घोषणा केली जाईल असे सांगण्यात आले होते.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

इंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारुपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ १६ जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघ –

मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक) झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.

टी-२० मालिकेसाठी संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.