वनडे वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर, पहिल्यांदाच वनडे खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. ब्रिस्बेन इथे झालेल्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ७० चेंडू आणि ६ विकेट्स राखून वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला. वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेलं तीनशेपल्याड धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करत ऐतिहासिक विजय साकारला होता.
भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर प्रतीका रावळ उर्वरित सामने खेळू शकली नव्हती. दुखापतीतून सावरलेल्या प्रतिकाने पुनरामगन केलं पण खेळपट्टीवर तिचा हजेरी क्षणिक ठरली. मेगन शूटने तिला भोपळाही फोडू दिला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिकाच्या जागी संधी मिळालेल्या शफालीला या सामन्यात चमक दाखवता आली नाही. डार्सी ब्राऊनने तिला ४ धावांवर बाद केलं.
वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाखेबंद शतकी खेळी साकारणाऱ्या जेमिमाला अॅशले गार्डनरने तंबूत परतावलं. तिने ८ धावा केल्या. सहकारी बाद होत असतानाही स्मृती नेहमीच्या सहजतेने खेळ करत अर्धशतक पूर्ण केलं. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या स्मृतीला ताहिला मॅकग्राने बाद केलं. स्मृतीने ७ चौकारांसह ५८ धावांची खेळी केली. अलाना किंगने दीप्ती शर्माला स्थिरावू दिलं नाही. स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध ऋचा घोष २३ धावाच करू शकली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ८४ चेंडूत ५३ धावांची संयमी खेळी केली. काशवी गौतमने ४३ धावा करत तिला चांगली साथ दिली. भारतीय संघाचा डाव २१४ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे अॅशले गार्डनरने ३ तर मेगन शूटने २ विकेट्स घेतल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हिली यांनी ५५ धावांची सलामी दिली. श्री चरणीने फोबीला बाद करत ही जोडी फोडली. तिने ३२ धावा केल्या. श्री चरणीनेच जबरदस्त फॉर्मात असलेल्या जॉर्जिआ वॉलला भोपळाही फोडू दिला नाही. अर्धशतकानंतर लगेचच एलिसा हिलीला क्रांती गौडने बाद केलं. यानंतर बेथ मूनी आणि अनाबेल सदरलँड यांनी चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूत ८५ धावांची भागीदारी केली. दीप्तीने मूनीला बाद करत ही जोडी फोडली.
मूनीने ५ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. अनाबेल आणि अॅशले गार्डनर यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अनाबेलने ४४ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. मूनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. २७ तारखेला दुसरा सामना होबार्ट इथे होणार आहे. दरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे हरमनप्रीत दुसऱ्या डावात मैदानात उतरली नाही. होबार्ट वनडेपर्यंत ती फिट होऊन परतणं भारतीय संघासाठी महत्त्वाचं आहे.
