नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगिरांचा आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) गुरुवारी अचानकच आपला संघ जागतिक स्पर्धेसाठी न पाठविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या १२ कुस्तीगिरांनी शुक्रवारी क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे धाव घेतली.
‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष संजय सिंह आणि व्यथित कुस्तीगिरांनी क्रीडामंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट साधारण तासभर चालली. त्यांच्या मदतीच्या आवाहनाला दाद देताना क्रीडामंत्र्यांनी कुस्तीगिरांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पाठविण्याची हमी दिली.
‘डब्ल्यूएफआय’ने काही दिवसांपूर्वी २३ वर्षांखालील आणि सीनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या या निर्णयाविरोधात कुस्तीगीर साक्षी मलिकचा पती सत्यव्रत कडियानने न्यायालयात धाव घेतली होती. क्रीडा मंत्रालयाने ‘डब्ल्यूएफआय’चे निलंबन केल्यानंतर त्यांचा दैनंदिन कारभार हाताळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (आयओए) हंगामी समितीची स्थापना करण्यात आली होती. या निर्णयाला ‘डब्ल्यूएफआय’ने न्यायालयात आव्हान दिले होते, पण न्यायालयाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने ‘डब्ल्यूएफआय’चे केलेले निलंबन कायम राहिले. निलंबित असलेल्या ‘डब्ल्यूएफआय’ने निवड चाचणी आयोजित करणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे म्हणत सत्यव्रतने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर ‘डब्ल्यूएफआय’ला निवड चाचणी रद्द करावी लागली आणि आपल्याला जागतिक स्पर्धेसाठी संघ पाठवता येणार नसल्याने त्यांनी संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेला (यूडब्ल्यूूडब्ल्यू) कळवले.
‘डब्ल्यूएफआय’ क्रीडामंत्रालयाकडून निलंबितच असले, तरी ‘आयओए’ने पुन्हा हंगामी समिती स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातील कुस्तीगिरांच्या भविष्याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘‘१०-१२ वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्हाला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी मिळते. मात्र, आता आमच्याकडून ही संधी हिरावून घेतली जात आहे. आमची नक्की चूक काय?’’ असा प्रश्न कुस्तीगीर मनीषा भानवालाने उपस्थित केला. ती जागतिक स्पर्धेसाठी महिलांच्या ६५ किलो वजनी गटातून पात्र ठरली.
मनीषासह मानसी अहलावत (५९ किलो), किर्ती (५५ किलो) आणि बिपाशा (७२ किलो) या महिला कुस्तीगीर, तसेच उदित (६१ किलो), मनीष गोस्वामी (७० किलो), परविंदर सिंग (७९ किलो), संदीप मान (९२ किलो) हे फ्री-स्टाईल प्रकारातील चार कुस्तीगीर, तसेच ग्रीको-रोमन प्रकारातील संजीव (५५ किलो), चेतन (६३ किलो), अंकित गुलिया (७२ किलो), आणि रोहित दहिया (८२ किलो) हे कुस्तीगीर क्रीडामंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले.
राष्ट्रीय महासंघाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांची कारकीर्द घडवून झाली आहे. आता ते आमच्या कारकीर्दीशी का खेळत आहेत? कनिष्ठ गटातील कुस्तीगिरांना त्यांच्या मदतीची आवश्यकता नाही. आम्हाला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळू न दिल्यास, आम्हीही आंदोलन करू. – मनीषा भानवाला, भारताची कुस्तीगीर.