Rashid Latif Statement: पाकिस्तानचा संघ गेल्या काही वर्षांत तिन्ही फॉरमॅटमध्ये संघर्ष करताना दिसून येत आहे. वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्येही पाकिस्तानचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील सुरूवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांध्ये दारूण पराभव झाल्यांतर पाकिस्तानने तिसऱ्या कसोटीआधी मुख्य प्रशिक्षकासह ७ खेळाडूंना घरी पाठवलं. तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानच्या प्लेईंग ११ मध्ये अनेक बदल करण्यात आले. पण असं असतानाही कामगिरीत काही सुधारणा झालेली नाही. आता पाकिस्तानच्या फ्लॉप कामगिरीचं खापर भारतावर फोडलं जात आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांनी आश्चर्यचकीत करणारं वक्तव्य केलं आहे

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांनी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांना भारताचा एजंट असं म्हटलं आहे. त्यांनी आयपीएलमध्ये प्रशिक्षण देऊन येणाऱ्या प्रशिक्षकांवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. माईक हेसन यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तानला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान पाकिस्तानी खेळाडूने भारतावर आरोप करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा भारतावर आरोप करण्यात आले आहेत.

काय म्हणाले राशिद लतीफ?

राशिद लतीफ यांनी नौमान निआज यांच्यासोबत चर्चा करताना म्हटले की, “परदेशी प्रशिक्षकांनी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. बॉब बूलमरबद्दल सांगायचं झालं, तर ते खूप प्रामाणिक होते. तसेच ज्योफ लॉसन देखील व्यक्ती आणि खेळाडू म्हणून प्रोफेशनल होते. ते लाहोरमध्येच राहायचे आणि प्रामाणिकही होते. ज्या परदेशी प्रशिक्षकांनी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे, त्यांनी प्रामाणिकपणे आपलं काम केलं आहे. पण आयपीएलमध्ये प्रशिक्षण देऊन येणाऱ्या प्रशिक्षकांवर मला नेहमीच डाऊट येतो.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “मी असं मुळीच म्हणत नाही की, कोणीही प्रामाणिक आणि निष्ठावान नाही. तसं असू शकतं, पण एकदा चौकशी करून घेणं योग्य ठरेल. जर तुम्ही त्यांचा भूतकाळ तपासून पाहिला, तर त्यांचे संबंध कुठेतरी जोडलेले दिसतीलच. जे नुकसान आपण करू शकत नाही, ते नुकसान कोणीतरी करू शकतं. जे प्रशिक्षक थेट आयपीएलमधून येतात, त्यांचा तिथेल लोक इच्छित असल्यास गैरफायदा घेऊ शकतात. त्याचप्रमाणे एजंटही तयार होतात. माईक हेसन हा पाकिस्तान क्रिकेटला उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने पाठवलेला एजंट आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे.”

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिका तर हातून गेली, पण तिसरा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानने संघात ७ बदल केले. यासह मुख्य प्रशिक्षकही बदलला. पण याचा काहीच फायदा झालेला नाही. पाकिस्तानचा संघ या संपूर्ण मालिकेत एकदाही २०० धावांचा पल्ला गाठू शकलेला नाही.