Paras Mhambare said We have taken decision considering the situation: डब्ल्यूटीसी फायनल सामन्यात पहिल्या दिवशी भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून ३२७ धावांचा डोंगर उभारला आहे. कोणताही भारतीय गोलंदाज आपला प्रभाव पाडू शकला नाही. या सामन्यात कसोटीतील नंबर-१ गोलंदाज आर अश्विनला चौथ्या संघात स्थान मिळाले नाही. मात्र कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय संघासाठी कामी येताना दिसत नाही. कारण ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यानंतर माजी खेळाडूंनी आश्विनला बाहेर करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी प्रतिक्रिया दिली.
आता टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी अश्विनला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आर अश्विनचा संघात समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पारस म्हांबरे यांनी ओव्हल कसोटीतील पहिल्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले की, ओव्हल येथील हवामान गेल्या तीन दिवसांपासून थंड आणि ढगाळ होते. विशेषत: सकाळच्या वेळी ही स्थिती होती. मात्र, दुपारी आणि सायंकाळी चांगला सूर्यप्रकाश होता. हे पाहून अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही.
परिस्थिती पाहता आम्ही हा निर्णय घेतला –
पारस म्हांबरे म्हणाले, “त्याच्या (अश्विन) सारख्या चॅम्पियन गोलंदाजाला वगळणे हा नेहमीच कठीण निर्णय असतो. सकाळची परिस्थिती पाहता, अतिरिक्त सीमर फायदेशीर ठरेल असे आम्हाला वाटले. या रणनीतीने भूतकाळातही आमच्यासाठी काम केले आहे. वेगवान गोलंदाजांनी आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. तुम्ही नेहमी मागे वळून असे म्हणू शकता की अतिरिक्त स्पिनर असणे चांगले झाले असते. पण परिस्थिती पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
खेळाडूंनाही सांघिक संयोजनाचे महत्त्व कळते – म्हांबरे
आश्विनबाबत टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षकांना विचारले की, ज्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जात नाही, त्याच्याशी संघ व्यवस्थापनाचा काय आणि कसा संवाद साधतात? या प्रश्नाला उत्तर देताना पारस म्हांबरे म्हणाले, “सामन्यापूर्वी आम्ही अनेक दिवस संघ संयोजनाविषयी चर्चा करतो. आम्ही येथे तीन-चार दिवस सराव केला आणि विकेट पाहून खेळाडूंशी चर्चा केली. खेळाडूंनाही सांघिक संयोजनाचे महत्त्व कळते.”
पहिल्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांनंतर ३ बाद ३२३ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड (१४६) आणि स्टीव्ह स्मिथ (९५) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. तसेच मार्नस लाबूशेन २६ धावांचे योगदान देऊन बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.