मिहीर वसवडा

‘युद्धजन्य परिस्थिती असल्यासारखं वातावरण आहे. एकावेळी अनेक गोष्टी समोर येत आहेत. रिअल टाईम मॉनिटरिंग आवश्यक असतं’, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला सांगत असतात. ते आणि त्यांच्या सहाजणांच्या चमूसमोर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंना फिट ठेवण्याचं आव्हान आहे. यामध्ये खेळाडूंच्या बरोबरीने संघटक, पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गेम्स व्हिलेज अर्थात खेलग्राम नसल्याने जपानमध्ये विविध ठिकाणी असलेल्या खेळाडूंना फिट ठेवणं हे डॉ. पारडीवाला आणि चमूसमोरचं मोठं आव्हान आहे. या चमूने भारतातून जपानला ४५० किलो रिकव्हरी आणि फिजिओथेरपीचं साहित्य नेलं आहे. याबरोबरीने १२० किलो औषधांचा साठाही नेला आहे. ‘हे खरंच आव्हानात्मक आहे. तीन डॉक्टरांनी एवढ्या मोठ्या पथकाला सांभाळणं कठीण आहे, पण आमचा पुरेपूर प्रयत्न आहे’, असं डॉक्टर सांगतात. डॉ. पारडीवाला यांनी देशातल्या अव्वल क्रीडापटूंवर उपचार केले आहेत. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मीराबाई चानू, पी.व्ही.सिंधू आणि विनेश फोगट यांचा समावेश आहे.

‘आम्ही सगळ्या प्रकारची औषधं आणली आहेत. सांधेदुखी, वात, श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, गायनॅक अशा प्रत्येक आजारासाठी औषधांचा साठा आणला आहे’, असं डॉक्टर सांगतात. डॉक्टरांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो आणि रात्री उशिरा संपतो. सकाळी ठीक ९ वाजता डॉक्टरांची विविध खेळांचे पदाधिकारी, संघटक,डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट अशा ४५ लोकांची मीटिंग होते.

‘दिवसभरात कोणत्या खेळांच्या स्पर्धा आहेत याचा आढावा घेतला जातो. पुढच्या दिवशी कोणत्या स्पर्धा होणार आहेत ते पाहिलं जातं. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल तर त्याच्या उपचारांची दिशा ठरवली जाते. सहाजणांच्या चमूला एकावेळी १५ ते १६ क्रीडापटूंची काळजी घ्यावी लागते. रात्रीच्या वेळीही उपचारांसाठी कॉल सुरू असतात. रात्री २ वाजताही कॉल येतो. खेळाडू स्पर्धांच्या निमित्ताने जपानच्या विविध भागात आहेत. त्यामुळे टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपचार सांगितले जातात. औषधांचे संच खेळाडू ज्या भागात आहेत तिथे पाठवण्यात आले आहेत’, असं डॉ. पारडीवाला सांगतात.

मूळ योजनेनुसार अ‍ॅथलिट्स प्लाझा इथे सेंट्रल रिकव्हरी रुम असणार होती. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला याकरता जागा देण्यात आली आहे. मात्र आयत्यावेळी खेळाडूंचीच राहण्याची व्यवस्था न झाल्याने ही जागा खेळाडूंना देण्यात आली. मेडिकल किंवा रिकव्हरी रुम नसल्यामुळे वैद्यकीय पथकाला एकत्रित केंद्राऐवजी विविध ठिकाणांहून काम करावं लागत आहे. रिकव्हरीच्या दृष्टीने तीन ते चार फिजिओथेरपीची फोल्डिंग बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत. पोर्टेबल बेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पाच पोर्टेबल आईसबाथही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

क्रायोकॉम्प्रेशन आणि कोल्थ थेरपी यांची सांगड घालण्यात आली आहे. खेळताना स्नायूंना तसंच सांध्यांना दुखापत झाली असेल तर तीन उपकरणं सज्ज ठेवण्यात आली आहेत. एक उपकरण मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि अन्य दोन गरजेनुसार पाठवली जातात. नॉर्मेटिक एअर कॉम्प्रेशन तसंच थेरपेटिक अल्ट्रासाऊंड आणि इलेक्ट्रोथेरपी साहित्यही खेळाडूंसाठी सुसज आहे.

‘ही उपकरणं जपानमध्ये आणणं एवढाच मुद्दा नाहीये. स्पर्धा संपल्यानंतर ते सुरक्षित मायदेशी आणणं हेही मोठं काम आहे. कारण हीच उपकरणं नंतरच्या स्पर्धांमध्ये कामी येतील’, असं डॉक्टरांनी सांगितलं. या सगळ्या उपकरणांची किंमत ५० लाखांच्या आसपास असल्याचं भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

जपानमध्ये औषधांसाठीचे नियम अतिशय कठोर आहेत. मध्यवर्ती ठिकाणी औषधं बंदिस्त स्थितीत असावीत असा जपानचा नियम आहे. रिकव्हरी साहित्य विविध ठिकाणी असलेल्या खेळाडूंप्रमाणे पुरवण्यात आलं आहे. गार्डन पिअर इथे कंटेनर व्यवस्थेत सेंट्रल मेडिकल स्टोअर उभारण्यात आलं आहे. डॉक्टरांनाही तात्पुरत्या स्वरुपाचे परवाने देण्यात आले आहेत.

डॉ. पारडीवाला यांच्या चमूचं श्वसनाशी निगडीत प्रादुर्भावावर बारीक लक्ष आहे. ‘क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना श्वसनाशी निगडीत त्रास झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, स्नायू यांचे त्रास जाणवतात. केवळ भारतीय खेळाडू असं नाही पण बहुतांश खेळाडूंना नाक, कान, घसा तसंच श्वसनाशी निगडीत आजार सतावतात असा आमचा अनुभव आहे’, असं डॉक्टर सांगतात.

‘दुर्देवाने काही आपात्कालीन परिस्थिती उद्बवल्यास आयची आणि नियोगा या शहरातल्या रुग्णालयांशी संपर्क करण्यात आला आहे. नियमांनुसार, आम्ही तिथे थेट जाऊ शकत नाही. आम्हाला कोणत्याही रुग्णालयात जायचं असेल तर आशियाई क्रीडा स्पर्धा सेंट्रल मेडिकल कमिटीशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर आम्हाला अपॉइंटमेंट दिली जाते. त्यानंतरच तिथे जाऊ शकतो. आपले खेळाडू कोणत्या भागात खेळत आहेत त्यानुसार रुग्णालयं कुठे आहेत ते आम्ही शोधलं आहे’, असं डॉक्टरांनी सांगितलं.