जागतिक कुस्ती महासंघाने(फिला) २०१६ साली रियो मध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ६० आणि ६५ किलो वजनी गट वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फिला’च्या या निर्णयाचा फटका भारताच्या सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांना बसणार आहे. भारताचे हे दोन्ही कुस्तीवीर याच वजनी गटात बसत असल्याने आगामी ऑलिम्पिक स्पर्धेला त्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.
योगेश्वर दत्त आणि सुशीलकुमार यांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये याच वजनी गटातून भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. यावेळी फिलाच्या जिनिव्हा येथे झालेल्या बैठकीत आंतराष्ट्रीय स्पर्धेत १८ वजनी गट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ६० आणि ६५ किलो वजनी गटाचा समावेश करण्यात आलेला नाही. फिलाच्या या निर्णयावर निषेध व्यक्त करत भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सचिव राजसिंग म्हणाले की, फिलाचा हा निर्णय भारतीय कुस्तीवर परिणाम करणारा ठरेल. या दोन्ही गटांत भारताला पुन्हा एकदा पदकांची आशा होती. अर्थात फक्त भारतालाच नाही यामुळे इतर देशांनाही याचा फटका बसणार आहे. असेही ते म्हणाले.
अर्थात या स्पर्धेला तीन वर्षे असल्याने ६० खालील वजनी गटात सहभागी होण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.