इंडो-पाकचं कथित गारूड

भारत आणि पाकिस्तान शब्द एकत्रित उच्चारले तरी कान टवकारले जातात, भुवया उंचावतात.

भारत-पाक क्रिकेट मॅचचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहाचा असतो. मात्र या मॅचमध्ये भावनिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्रामुख्याने पुढे येतो. या निमित्ताने विविध वृत्तवाहिन्यांचीही इंडो-पाक या गारुडामुळे झालेली अपरिहार्यता दिसून येते.

भारत आणि पाकिस्तान शब्द एकत्रित उच्चारले तरी कान टवकारले जातात, भुवया उंचावतात. बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील लढतीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. क्रिकेट विश्वातलं सगळ्यात रोमांचक द्वंद्व असं या लढतीचं वर्णन होतं. मात्र फलंदाजी-गोलंदाजी-क्षेत्ररक्षण या तीन आघाडय़ांपेक्षा भारत-पाकिस्तानची मॅच भावनिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा कळीची ठरते. वाहिन्यांची अपरिहार्यता असलेल्या या इंडो-पाक गारुडाविषयी.

आशिया उपखंडातले हे दोन शेजारी देश. अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. तेव्हापासून झालेली जखम आजही भळभळती आहे. पाकिस्तान हा आपला एकमेव शेजारी नाही. चीन, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, म्यानमार असे आपले अनेक शेजारी देश आहेत. परंतु पाकिस्तानविरुद्धचे शत्रुत्व वेगळे आहे. भारतात दहशतवादाची पाळेमुळे रोवण्यात पाकिस्तानचा सहभाग, भारतीय लष्करावर सातत्याने केले जाणारे हल्ले तसंच वेगवेगळ्या पद्धतीने भारताला त्रास देणारी अशी पाकिस्तानची कृष्णकृत्यं नित्यनेमाची आहेत. एवढं होऊनही दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या फेऱ्या, शांतीची कबुतरं, अमन की आशासदृश गोष्टी होतच असतात. याचं कारण व्यावसायिक हितसंबंध. पाकिस्तानला आपली जास्त गरज आहे, मात्र आपल्यालाही त्यांची आवश्यकता आहेच. सामान्य नागरिकांच्या मनात मात्र पाकिस्तानविषयी द्वेष आहे. साहजिकच दैनंदिन संभाषणात, सोशल मीडियावर पाकिस्तानचा वारंवार उद्धार केला जातो. भारत-पाकिस्तान क्रिकेट लढती हा दोन्ही देशांना एकमेकांविरुद्ध समोर आणणारा क्षण. युद्धात, सीमेवर पाकिस्तानची माणसं ज्या काही कागाळ्या करतात त्याचा सूड घेण्याची संधी म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना असं अनेकांना वाटतं. हा सामना हरलो तर पातक वाटावं इतकं दडपण तथाकथित राष्ट्रप्रेमी चाहते आणतात.

भारतीय क्रीडाविश्वात क्रिकेट हा सगळ्यात खपणीय खेळ. अब्जावधींची बाजारपेठ या खेळाने व्यापली आहे. मात्र ३६५ पैकी ३४० दिवस रोज कुठलातरी संघ खेळत असतो आणि तो सामना टीव्हीवर दिसत असतो. त्यामुळे त्याचं अप्रूप राहिलेलं नाही. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांपासून प्रेक्षक केव्हाच दूर गेलेत. आठ तास चालणारे एकदिवसीय सामनेसुद्धा प्रेक्षकांना रटाळ वाटू लागलेत. यातूनच ट्वेन्टी-२० या खमंग प्रकाराचा उदय झाला आहे. पुढील महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याच देशात आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून एरव्ही पन्नास षटकांचे सामने असणाऱ्या आशिया चषकाचे स्वरूपच बदलण्यात आले. आता या स्पर्धेत बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आहेत. साहजिकच बहुतांशी सामने एकतर्फी आणि नीरस होणे ओघानं आलंच. जर या स्पर्धेद्वारे उखळ पांढरं करून घ्यायचं असेल तर एकमेव संधी म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. अन्य सामन्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग आणि या लढतीला मिळणारा चाहतावर्ग यामध्ये प्रचंड तफावत असते. असा दावा क्रीडा वाहिन्या नेहमीच करतात. पण या सामन्यासाठी वातावरणनिर्मित्ती याच वाहिन्या करतात.

भारत-पाक लढत पक्की झाली की साधारण महिनाभर आधीच जाहिरातींचा मारा सुरू होतो. क्रिकेटचे आणि एकूणच देशाचे सच्चे पाईक असाल तर हा सामना चुकवू नका असा भडिमार केला जातो. बेस्ट ऑफ इंडो-पाक लढतींच्या हायलाइट्स दाखवल्या जातात. या लढतींदरम्यान खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाची, भांडणं, नोंकझोक या स्वरूपाच्या क्लिप्स जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जातात. दोन्ही संघांच्या खेळाडूंची एकमेकांबद्दलची वक्तव्यांना भरपूर प्रसिद्धी दिली जाते. नोकरी-व्यवसाय सोडून, कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपापल्या संघांचे सामने पाहायला जाणाऱ्या चाचा किंवा भक्तगणांच्या विशेष मुलाखती प्रक्षेपित केल्या जातात. या लढतीत जिंकणं कसं मस्ट आहे, त्यासाठी आम्ही कसा सपोर्ट करत आहोत अशा वाचाळ फॅन्सच्या प्रतिक्रिया वारंवार दाखवल्या जातात. खरं तर जेमतेम दहा-बारा देश क्रिकेट खेळतात. त्यातही मुख्य असे सात-आठ देश. अन्य संघांविरुद्धचे सामनेही तितकेच रोमांचक, थरारक पर्वणी देणारे असतात. पण क्रीडा वाहिन्या, वृत्तवाहिन्या यांच्या टीआरपीसाठी भारत-पाक लढती खपाचा मुद्दा असतो. या लढती होणं त्यांच्यासाठी सोन्याची अंडं देणाऱ्या कोंबडीसारखं असतं. या सामन्यासाठी जाहिरातींचे दर गगनाला भिडतात. हे सगळे कोटीचीही वेस ओलांडतात. ही लढत पाहण्यासाठी असंख्य माणसं वेळ, पैसा खर्च करून तो देश गाठतात. यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. या मालिकेवर आधारित स्पोर्ट्स शोलासुद्धा सर्वाधिक प्रेक्षकवर्ग असतो.

प्रत्येक देशात लोकशाही, साम्यवादी, समाजवादी, राजघराणं, लष्करशाही अशी कुठलीतरी व्यवस्था असते. पाकिस्तानात अनागोंदी असते. कोणाचंही सरकार असलं तरी तिथे केव्हाही काहीही विघातक घडू शकतं. तिथे कोणीच सुरक्षित नाही. रक्तपात, हल्ले हे तर पाचवीलाच पुजलेले. सामान्य माणसांचं जिणं नकोसं झालेला हा दरिद्रीभगवान देश. याच देशातल्या क्रिकेटचं नियंत्रण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नामक संघटना करते. या संघटनेला संविधान नाही. अध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदांसाठी नेहमीच संगीतखुर्ची खेळ सुरू असतो. बोर्डाची आर्थिक अवस्था खंगाळ आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेला श्रीलंकेचा संघ दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये विदेशी संघांनी जाणं बंद केलं. त्यांचे सामने दुबईतल्या वाळवंटात होतात. पाकिस्तानचे खेळाडू बेताल वर्तनासाठी ओळखले जातात. अरेरावी, गोलंदाजीची सदोष शैली, मारामारी, धमकी, अर्वाच्य भाषा अशा सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींत ते हमखास आढळतात. मुख्य संघ असूनही त्यांच्या खेळाडूंना इंग्रजीत बोलता येत नाहीत. असा हा संस्कृतीहीन आणि कंगाल संघ.

हे सगळं असलं तरी उपजत गुणवत्ता हे पाकिस्तानच्या संघाचं वैशिष्टय़ आहे. मात्र गुणवत्तेला पैलू पाडणं, शिस्त लावणं आवश्यक असतं. पण हे करण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांचे क्रिकेटपटू बहकतात. सातत्यपूर्ण असातत्यासाठी पाकिस्तानचा संघ ओळखला जातो. एकाच महिन्यात ते झिम्माब्वेकडून पराभूत होऊ शकतात आणि आठच दिवसांत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला चीतपट करू शकतात. अशा या संघाला आणि त्यांच्याविरुद्धच्या सामन्यांना वारेमाप प्रसिद्धी देऊन आपणच त्यांना मोठं करतो. इतकी त्यांची लायकीही नाही. पण पैसा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. २८ जानेवारी, शनिवारचा दिवस. दिवसभर जेएनयू, स्मृती इराणी असे विषय चघळल्यानंतर संध्याकाळी ६ ते रात्री ११ बक्कळ टीआरपी मिळवून देणारा इव्हेंट म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच. पाकिस्तानविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकली ही रुटिन ब्रेकिंग न्यूज असते. विराट कोहलीने फििक्सगप्रकरणी बंदीची शिक्षा भोगून पाच वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद आमीरचं केलेलं कौतुक स्कॅनरखाली धरलं जातं.

सतत आपल्याला त्रास देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका नको असं म्हणायचं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित स्पर्धामध्ये भारत-पाकिस्तान लढतीला युद्धाप्रमाणे वागवायचं अशी दुतोंडी भूमिका वाहिन्यांना घ्यावी लागते. याची कारणं आर्थिक उलाढालींमध्ये आहेत. आयसीसीची स्पर्धा असली, कोणत्याही देशात असली तरी भारत-पाकिस्तान लढतीला सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळते. मैदानही हाऊसफुल्ल असतं. सोशल मीडियावरही याच लढतीचा बोलबोला असतो. साहजिकच सगळ्यांचाच फायदा. अन्य सामने तेवढे लोकप्रिय होऊ शकत नाहीत. मग कमाईचा हा हुकमी मार्ग शोधला जातो. आताही आशिया चषक कोणीही जिंकला तरी प्रक्षेपणकर्त्यां स्टार वाहिनीला फरक पडणार नाही. कारण भारत-पाकिस्तान लढतीद्वारे त्यांनी बहुतांशी नफा पदरात पाडून घेतला आहे. वृत्तवाहिन्यांनाही चघळायला किमान तीन दिवस पुरेसा मजकूर मिळाल्याने तेही आनंदित आहेत. दुसरीकडे पाकिस्तानला कसं ठेचलं या आनंदात सामान्य प्रेक्षक आहेत.

या सगळ्यात खेळाडूंवर या लढतीचा अनावश्यक दबाब टाकला जातो याचा विचारच होत नाही. या सामन्यात सुटलेल्या झेलसाठी, चुकलेल्या रनआऊटसाठी किंवा एखाद्या चुकीच्या फटक्यासाठी खेळाडूंना व्हिलन केलं जातं. काही फाजील वृत्तवाहिन्या तर या खेळाडूंना गद्दार म्हणायलाही धजावतात. नामिबियाविरुद्ध हरलात तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्ध जिंकायलाच हवं असं दडपण आणलं जातं. शंभर टक्के प्रयत्न दिल्यानंतरही काही वेळेला पराभव होतो. पण खेळाडूंनी, संघाने पुरेपूर संघर्ष केलेला असतो. नेहमी जिंकणंच खरं चित्र स्पष्ट करत नाही, पण पाकिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंवर सदैव दबाब आणला जातो. भारत-पाकिस्तान लढतींच्या वेळी युद्धस्वरूप परिस्थितीचा केला जाणारा बनाव कमी करण्याचे काम गेल्या वर्षी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक यांनी केले. भारत-पाकिस्तान सामना योग्य खेळभावनेसह खेळला जाईल आणि जिंकणं, हरणं यापेक्षाही क्षमतेनुरूप सर्वोत्तम प्रदर्शन करण्याला महत्त्व आहे अशी सूज्ञ भूमिका या कर्णधारांनी घेतल्याने वाहिन्यांची स्पाइसी बाइट मिळवण्याची संधी वाया गेली.

बाकी सोंगं वठवता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. भावनिक गोष्टी कितीही हृदयद्रावक वाटल्या तरी पैशांशिवाय व्यक्ती तसंच संस्था, संघटना यांचं चालत नाही. कागदावर आकर्षक वाटणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात आतबटय़ाचा व्यवहार ठरतो. अशा वेळी पाकिस्तान हे नाव उच्चारताच निर्माण होणारा द्वेषभाव एन्कॅश केला नाही तरच नवल. पालापाचोळा गोळा करायचा, वाऱ्याची दिशा पाहायची, काडी पेटवायची आणि स्वत:च आग लागली म्हणून ब्रभा करायचा असा हा प्रकार. एरव्ही पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्वरूपाचे संबंध नकोत म्हणणारे भारत-पाकिस्तान सामना पक्का झाल्यावरच कामाला लागतात. ऊठसूट त्यांना बोल लावणारे, त्यांना शिव्याशाप देणारे आपण त्यांच्याविरुद्ध सामना खेळूनच पैसा कमावतो. जगण्यासाठी पैसा लागतोच, पण एरव्ही तत्त्वं, निष्ठा, राष्ट्रवादाची पताका घेऊन निघालेली मंडळीच पाकिस्तानला अकारण मोठं करतात, त्यांचं महत्त्व वाढवतात हे सिद्ध होतं आहे. पैसा कमावण्यासाठी हे अपरिहार्यतेचं गारुड बाजूला सारलं जाईल तो सुदिनच म्हणायला हवा!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indo pak cricket match