इन्टानॉनकडून पराभूत; सात्त्विक-चिरागचे आव्हानही संपुष्टात

बाली : भारताची दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूला सलग तिसऱ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शनिवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला माजी विश्वविजेत्या थायलंडच्या रॅटचॅनोक इन्टानॉनने पराभूत केले. पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचेही आव्हान संपुष्टात आले.

तिसऱ्या मानांकित सिंधूचा महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित इन्टानॉनने २१-१५, ९-२१, १४-२१ असा पराभव केला. ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने झुंज दिली, पण इन्टानॉनने तिच्यापेक्षा दर्जेदार खेळ करत विजयाची नोंद केली. तिला मागील आठवडय़ात इंडोनेशिया मास्टर्स आणि त्याआधी फ्रेंच स्पर्धेतही उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले होते.

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूकडे सामन्याच्या सुरुवातीला ८-३ अशी आघाडी होती. अखेर तिने पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा खेळ खालावला. इन्टानॉनने हा गेम २१-९ असा जिंकत सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही इन्टानॉनने दमदार खेळ सुरु ठेवत मध्यंतराला ११-६ अशी भक्कम आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इन्टानॉनने हा गेम २१-१४ असा जिंकत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, सात्त्विक-चिरागला उपांत्य फेरीत केव्हिन सुकोमुल्जो आणि मार्कस जिडीऑन या अग्रमानांकित जोडीने १६-२१, १८-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.