दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

सिंधूला महिला एकेरीत जपानच्या अव्वल मानांकित अकाने यामागुचीने, तर श्रीकांतला पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या तिसऱ्या मानांकित अँडर्स ?न्टोन्सेनने पराभूत केले. उपांत्य फेरीत या दोघांनाही त्यांचा खेळ उंचावता आला नाही आणि त्यांनी सरळ गेममध्ये सामने गमावले.

यामागुचीविरुद्ध एकूण विजयांत सिंधू १२-७ अशी पुढे होती. तसेच या वर्षी झालेल्या दोन्ही सामन्यांत सिंधूनेच बाजी मारली होती. मात्र, शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तिने निराशा केली. ३२ मिनिटे चाललेला हा सामना यामागुचीने २१-१३, २१-९ अशा फरकाने जिंकला. तिसरी मानांकित सिंधू दोन्ही गेममध्ये सुरुवातीलाच पिछाडीवर पडली. यातून सावरणे तिला अवघड गेले. यामागुचीने दमदार खेळ करत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी तिच्यापुढे दक्षिण कोरियाच्या चौथ्या मानांकित आन सेयंगचे आव्हान असेल.

दुसरीकडे, भारताच्याच एचएस प्रणॉयला धूळ चारून उपांत्य फेरी गाठणाऱ्या श्रीकांतला अ‍ॅन्टोन्सेनकडून १४-२१, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने प्रतिकार केला. परंतु दुसऱ्या गेममध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. अ‍ॅन्टोन्सेनचा अंतिम फेरीत केंटो मोमोटाशी सामना होईल.