साईप्रणीत पराभूत

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा

दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बी. साईप्रणीतला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत तिसऱ्या मानांकित सिंधूला विजयासाठी एक तास आणि सहा मिनिटे संघर्ष करावा लागला. पहिला गेम गमावूनही सिंधूने दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्यावर १४-२१, २१-१९, २१-१४ अशी मात केली. शनिवारी उपांत्य फेरीर्त ंसधूसमोर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित रॅटचॅनोक इन्टानॉनचे कडवे आव्हान असेल. इन्टानॉनने अग्रमानांकित अकाने यामागुचीला धूळ चारली.

पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग यांच्या सहाव्या मानांकित जोडीने मलेशियाच्या नुर इझुद्दीन आणि गोह झे फेई यांना २१-१९, २१-१९ असे सरळ दोन गेममध्ये नमवले. दोघांनी ४३ मिनिटांत हा सामना जिंकला. उपांत्य फेरीत सात्त्विक-चिरागची इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी केव्हिन सुकामुल्जो आणि मार्कस जिडीऑन यांच्याशी गाठ पडणार आहे.

पुरुष एकेरीत साईप्रणीतला डेन्मार्कच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनने १२-२१, ८-२१ असे सहज पराभूत केले. साईप्रणीतच्या पराभवासह भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.