Indonesia Open : जकार्ता येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हे बिन्गजिओ हिने तिला २१-१४, २१-१५ असे सरळ गेममध्ये नमवले. पहिले किदम्बी श्रीकांत, नंतर सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांच्या पाठोपाठ सिंधूच्या पराभवासोबत भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने बिन्गजिओ हिला १०-११ अशी झुंज दिली होती. पण त्यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे सिंधूला पहिला गेम २१-१४ असा गमवावा लागला. दुसऱ्या गेममध्ये हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती. पण हा गेमदेखील एकतर्फीच झाला. या गेममध्ये बिन्गजिओला ९-११ अशी टक्कर देण्यात सिंधूला यश आले होते. पण त्यानंतर पहिल्या गेमचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. बिन्गजिओ हिने हा सामना २१-१४, २१-१५ असा जिंकला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत काल सिंधूने वाढदिवशी विजय साजरा केला होता. तिने जपानच्या अया ओहोरी हिला २१-१७, २१-१४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर सलामीच्या सामन्यात थायलंडच्या चोचुवाँग हिचा २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला होता.