scorecardresearch

INDvsAUS 4th Test: शुबमन गिलचा नाद करायचा नाय! टेस्टमध्ये झळकावले दुसरे शतक, अहमदाबाद कसोटी झाली रोमांचक

भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिलने कसोटीतील दुसरे शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

INDvsAUS 4th Test: Shubman Gill scored an excellent century India crossed 180 runs
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्माच्या रूपाने एक विकेटह गमावली आहे. मात्र, भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. सध्या अहमदाबाद कसोटी रोमांचक बनली आहे.

दुसऱ्या दिवसाच्या ३६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आक्रमक सुरुवात करत शानदार फलंदाजी केली. मिचेल स्टार्क, लायन यांना त्यांनी चौकार आणि षटकार ठोकत धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी केली त्यात यशस्वी देखील होत होते. मात्र, त्याच दरम्यान स्मिथ रोहितला बाद करण्यासाठी वेगवेगळे क्षेत्ररक्षण लावत होता जेणेकरून फलंदाजांचे एकाग्रता भंग होईल आणि तसेच झाले. शुबमन गिलने सामन्यातील सगळी सूत्रे आपल्या हाती घेत एक बाजूने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. आणि कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक साजरे केले. त्याच्या या शतकी खेळीला १० चौकार आणि एका षटकाराचा साज होता.

ज्या षटकात शुबमनने शतक झळकावले, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला. चेतेश्वर पुजाराही अर्धशतकाच्या जवळ होता मात्र तो अपयशी ठरला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू आऊट केले. पुजाराचे अर्धशतक हुकले आणि तो १२१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ४२ धावा करून बाद झाला. पुजाराने शुबमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूत ११३ धावांची भागीदारी केली. सध्या शुबमन गिल १०२ धावांवर असून विराट कोहली खेळपट्टीवर आहे.चहापानापर्यंत भारताने दोन गडी गमावून १८८ धावा केल्या आहेत. भारत आता ऑस्ट्रेलियापेक्षा २९२ धावांनी मागे आहे.

तत्पूर्वी, शुबमन गिलने १९४ चेंडूत दुसरे कसोटी शतक झळकावले. त्याने टॉड मर्फीला फाइन लेगवर फोर मारून शतक पूर्ण केले. एकंदरीत हे त्याचे सातवे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. शुबमनने वन डेमध्ये चार शतके आणि टी२० मध्ये एक शतक केले आहे. शुबमनने बांगलादेशविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तसेच न्यूझीलंडविरुद्ध वन डेमध्ये त्याने आपले पहिलेवहिले द्विशतक देखील केले आहे.

रोहित शर्माने देखील केला नवीन विक्रम
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेल्या ४८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला उतरले होते. यावेळी रोहितच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. रोहित अवघ्या ३५ धावांवर तंबूत परतला. यावेळी भारताची धावसंख्या ७४ होती. रोहितने ३५ धावा करताना १ षटकार आणि ३ चौकारांची बरसात केली. तो बाद झाला असला, तरी त्याने खास विक्रम केला. रोहित मायदेशात खेळताना कसोटीत वेगवान २००० धावा करणारा दुसरा फलंदाज बनला.

चौथा कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशा स्थितीत भारताला चौथा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 14:14 IST
ताज्या बातम्या