Rising Star Women’s Asia Cup 2026: महिलांचा रायझिंग स्टार आशिया चषक २०२६ बँकॉकमध्ये खेळवला जात आहे. या स्पर्धेत आज म्हणजेच १५ फेब्रुवारीला भारत अ आणि पाकिस्तान अ महिला संघांमध्ये सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तान संघावर एकतर्फी विजय मिळवला. गोलंदाजीत भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत अवघ्या १० षटकांत संघाने हा सामना जिंकला आहे.

राधा यादव रायझिंग स्टार आशिया चषकात भारताच्या महिला संघाचं नेतृत्त्व करत आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात संघाला युएईच्या अ संघाविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. पण पाकिस्तानविरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताच्या अ संघाने स्पर्धेतील आपली मोहिम कायम ठेवली आहे.

पाकिस्तानने दिलेल्या ९४ धावांचं लक्ष्य टीम इंडियाने १०.१ षटकांत पूर्ण केलं. भारताकडून हुमैरा काझी पहिल्या षटकात झेलबाद झाली. यानंतर अनुष्का शर्मा व वृंदा दिनेश यांनी ५० चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. अनुष्का २४ धावांवर झेलबाद झाली. यानंतर वृंदा दिनेशने २९ चेंडूत १२ चौकारांसह ५५ धावांचा नाबाद खेळी केली आणि संघाच्या विजयाचा हिरो ठरली. तर तेजल हसबनीसने ५ चेंडूत १ चौकार व षटकारांसह १२ धावा केल्या. यासह टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला.

पाकिस्तान अ संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय संघाने चुकीचा ठरवला. पाकिस्तानने पहिल्याच षटकात विकेट गमावली. यानंतर शावाल झुल्फिकार हिने २३ धावा केल्या. तर गुल रूख हिने २१ धावा अन् अनोशा नसीरने १७ धावांचं योगदान दिलं. याशिवाय एकही पाकिस्तानी फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही आणि परिणामी संघ ९३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून साईमा ठाकोर, प्रेमा रावत व राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर जिन्तीमनी कलिता, मिन्नू मणी यांनी १-१ विकेट्स घेतल्या.

आज भारताचा वरिष्ठ पुरूष संघ टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरूद्ध सामना खेळणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील चुरस वेगळी असते. आता या सामन्यापूर्वी भारताच्या अ महिला संघाने चमकदार कामगिरी करत विजय नोंदवला आहे.