INDW vs NEDW Highlights in Marathi: भारताच्या महिला संघाने नेदरलँड्सविरूद्ध सामन्यात ९५ धावांनी मोठा विजय नोंदवला. भारताचा टी-२० विश्वचषक इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने या मोठ्या विजयासह अ गटाच्या गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. भारताने उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीच्या बळावर नेदरलँड्स संघाला ११४ धावांवर सर्वबाद केलं.

नेदरलँड्स महिला संघाची कर्णधार बॅबेट डी लीडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २०९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ १७.३ षटकांत ११४ धावांत सर्वबाद झाला; या सामन्यात टीम इंडियाकडून श्री चरणी आणि शफाली वर्मा यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. या विजयासह टीम इंडिया आता ‘अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

नेदरलँड्सच्या महिला संघाने विजयासाठीचं लक्ष्य गाठण्यास सुरुवात केली, तेव्हा ३४ धावांच्या धावसंख्येवर त्यांची पहिली विकेट हेदर सीगर्सच्या रूपात पडली; त्यानंतर ठराविक अंतराने त्यांच्या विकेट्स पडत राहिल्या. या सामन्यात नेदरलँड्सच्या महिला संघाकडून कर्णधार बॅबेट डी लीड हिने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिलं. दुसरीकडे, नेदरलँड्स संघातील सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारतीय महिला संघाच्या गोलंदाजीमध्ये श्री चरणीने ४ आणि शफाली वर्माने ३ बळी घेतले, तर नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी अनुक्रमे २ आणि १ बळी मिळवले.

या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाला उपकर्णधार स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. नेदरलँड्सच्या गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेत, या सलामीच्या जोडीने अवघ्या ११.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची विक्रमी भागीदारी रचली. शफाली वर्माने मैदानावर चहूबाजूंना फटकेबाजी करत अवघ्या ३८ चेंडूंत शानदार ५५ धावा केल्या; तिच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता.

दरम्यान, स्मृती मानधनाने डच गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिने केवळ ४७ चेंडूंत ७४ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ११ चौकार आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश होता. या स्पर्धेतील तिचं हे सलग दुसरे अर्धशतक ठरलं; याआधी तिने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतरही धावांचा वेग मंदावला नाही; उलट, यष्टिरक्षक-फलंदाज ऋचा घोषने शेवटच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत केवळ ८ चेंडूंत नाबाद २० धावांची खेळी केली.