भारतीय पुरुष संघ इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर असताना भारतीय महिलासंघ देखील श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात प्रत्येकी तीन सामन्यांची टी २० आणि एकदिवसीय मालिका भारतीय मुलींना खेळायची होती. या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय महिला संघाने धडकेबाज कामगिरी केली आहे. टी २० पाठोपाठ मुलींनी एकदिवसीय मालिकादेखील ३-०अशी जिंकली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुलींनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला २५६ धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार हरमनप्रीत कौर (७५), शेफाली वर्मा (४९) आणि पूजा वस्त्रकार (५६) यांच्या चमकदार फलंदाजीच्या बळावर भारताला आपला धावफलक अडीचशेपार नेण्यात यश आले होते.

भारताने दिलेले २५६ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान पूर्ण ५० षटके खेळता आली नाहीत. श्रीलंकेचा संघ ४७.३ षटकांत सर्वबाद २१६ धावाच करू शकला. लंकेच्यावतीने निलाक्षी डी सिल्वाने सर्वाधिक ४८ (नाबाद) धावा केल्या. कर्णधार चामरी अथापथुनेदेखील ४४ धावांची खेळी केली.

हेही वाचा – Sania Mirza Retirement : “मला नक्कीच आठवण येईल”, निवृत्तीनंतर भारतीय सानियाची भावनिक पोस्ट

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने भारताने जिंकले होते. दुसऱ्या सामन्यात तर एकही गडी न गमावता १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. त्या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी ही किमया करून दाखवली होती.