India Women will face Sri Lanka Women in Women Asia Cup 2026 Final: महिला टी-२० आशिया चषक २०२६ चे दोन फायनलिस्ट संघ ठरले आहेत. भारताने बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमध्ये खेळवला गेला. पाकिस्तानला ४ विकेट्सने नमवत श्रीलंकेने अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. आता आशिया चषकाचा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार, जाणून घेऊया.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १३० धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने १८.४ षटकांत ६ गडी गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
भारत आणि श्रीलंका संघांमध्ये महिला आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना रंगणर आहे. हा अंतिम सामना १३ सप्टेंबरला रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमयवर होईल. हा सामना भारतीय वेळनुसार संध्याकाळी ८ वाजता खेळवला जाईल. तर सामन्याची नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे ७.३० वाजता होईल. आशिया चषकाचा अंतिम सामना हा सोनी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर सोनी लिव्ह अॅपवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.
श्रीलंका सलग तिसऱ्यांदा या अंतिम सामन्यात पोहोचली आहे आणि सलग तिसऱ्यांदा भारताविरूद्ध फायनल खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यापूर्वी २०२२ आणि २०२४ च्या अंतिम सामन्यांत आमनेसामने आले होते; २०२२ मधील फायनलमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता, तर २०२४ मधील फायनलमध्ये श्रीलंकेने बाजी मारली होती. आता भारतीय संघाकडे श्रीलंकेविरुद्धच्या त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. दंबुला येथे झालेल्या आशिया चषक २०२४ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय संघाकडे टी-२० फॉरमॅटमध्ये चौथ्यांदा आणि विक्रमी आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी आहे.
