आयपीएलचा १९वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्लेऑफ प्रवेशासाठीची चुरस अतिशय तीव्र झाली आहे. लखनौ आणि मुंबईवगळता बाकी ८ संघ प्लेऑफसाठी शर्यतीत आहेत मात्र प्रत्येक संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे. स्पर्धेच्या आधीपासून संघांना लागलेलं दुखापतीचं ग्रहण स्पर्धा संपायला आली तर कायम आहे. महत्त्वाच्या खेळाडूंना मोक्याच्या क्षणी दुखापत होणं संघाचं संतुलन बिघडवू शकतं. यंदा दुखापतींचं प्रमाण बाकी हंगामांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. प्रचंड उष्ण आणि आर्द्र वातावरणात सामने सुरू आहेत. ३५ ते ४० डिग्री वातावरणात खेळणं सोपं नाही. दुखापत झाली तर त्यातून सावरण्यासाठी खेळाडूंकडे पुरेसा वेळ नाही. हॉटेल, स्टेडियम आणि विमानतळ अशी खेळाडूंची तिहेरी कसरत सुरू आहे. दर काही दिवसांनी संघ दुखापतग्रस्त खेळाडू आणि बदली खेळाडूची घोषणा करतात. हा शिरस्ता होऊन गेल्यामुळे इंज्युअर्ड प्रीमिअर लीग असंच वाटू लागलं आहे. जाणून घेऊया नेमके किती खेळाडू दुखापतग्रस्त झाले, किती स्पर्धेबाहेर गेले.

महेंद्रसिंग धोनी
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार पायाला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात अद्यापही खेळू शकलेला नाही. २००८ ते २०२५ या १८ वर्षात धोनी या स्पर्धेत केवळ पाच सामने खेळू शकला नाही. मात्र यंदा हंगाम सुरू होण्याच्या आधी धोनीसंदर्भात बातमी आली. हंगाम पुढे सरकू लागला तसा धोनी फिट होऊन परतेल अशी चाहत्यांना आशा वाटू लागली. मात्र दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने धोनी यंदा एकही सामना खेळू शकलेला नाही. चेन्नई सुपर किंग्स संघ सुरुवातीला चाचपडत होता. मात्र नंतर त्यांना लय गवसली आहे. प्लेऑफसाठी ते पात्र ठरू शकतात. या महत्त्वपूर्ण टप्पावर धोनी खेळायला उतरणार का? हा चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. धोनीचं वय पाहता तो कधीही निवृत्तीची घोषणा करू शकतो.

आयुष म्हात्रे
धडाकेबाज युवा फलंदाज आयुष म्हात्रे दमदार फॉर्मात असताना दुखापतग्रस्त झाला. हैदराबादविरुद्धच्या लढतीत आयुषच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली. चेन्नईच्या फिजिओंनी मैदानात धाव घेत त्याच्यावर उपचार केले होते. त्यानंतर आयुष पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकेरी धाव घेतली. मात्र दुखापत गंभीर असल्याने आयुषने लंगडत कशीबशी ही धाव पूर्ण केली. तो रनआऊट होता होता वाचला. फिजिओ पुन्हा मैदानात आले. मात्र त्याला खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं. आयुषची दुखापत बरी होण्यासाठी ६ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने उर्वरित हंगामात तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं.

खलील अहमद
चेन्नईला खलील अहमदच्या दुखापतीच्या रुपात आणखी एक धक्का बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील हा चेन्नईच्या योजनांचा महत्त्वपूर्ण भाग होता. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत खलीलचे मांडीचे स्नायू दुखावले. एक्स रे चाचणीसाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्यामुळे खलील उर्वरित हंगाम खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. आघाडीचा गोलंदाजच स्पर्धेबाहेर गेल्याने चेन्नईला सगळे डावपेच नव्याने आखावे लागले.

नॅथन एलिस
हाणामारीच्या षटकात धावा रोखणे आणि विकेट्स पटकावणे यासाठी चेन्नईने विचारपूर्वक नॅथन एलिसला संघात समाविष्ट केलं होतं. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वीच एलिस मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.

रामकृष्ण घोष
नाशिकचा युवा गोलंदाज रामकृष्ण घोषने यंदाच्या हंगामात आयपीएल पदार्पण केलं. पहिल्या लढतीत अफलातून झेल आणि विकेट पटकावत रामकृष्णने आपली उपयुक्तता सिद्ध केली. मात्र याच सामन्यात रामकृष्णच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं चेन्नई सुपर किंग्सच्या वैद्यकीय चमूने स्पष्ट केलं. २०२५ मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने रामकृष्णला ३० लाख रुपये मोजून ताफ्यात घेतलं. पण त्याला गेल्या वर्षी एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. चेन्नईने त्याला रिटेन केलं. शनिवारी त्याला पदार्पणाची संधी मिळाली मात्र दुर्देवाने याच लढतीत तो तो दुखापतग्रस्त झाला.

जेमी ओव्हर्टन
मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असलेल्या जेमी ओव्हर्टनने चेन्नईसाठी अष्टपैलू भूमिका निभावली होती. मधल्या षटकांमध्ये धावा रोखून विकेट्स पटकावण्यात ओव्हर्टनचा मोलाचा वाटा होता. कर्णधार ऋतुराज गायकवाडचा तो विश्वासू साथीदार झाला होता. प्लेऑफ प्रवेशासाठी चुरस तीव्र झालेला असताना ओव्हर्टन दुखापतग्रस्त झाल्यामुळे चेन्नईचं पारडं कमकुवत झालं आहे.

टॉम बॅन्टन
हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आक्रमक फलंदाज टॉम बॅन्टन दुखापतीमुळे मायदेशी परतला. बॅन्टन गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती.

पृथ्वी राज
गुजरात टायटन्सचा हा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाला. गुजरातच्या राखीव गोलंदाजांच्या फळीचा तो भाग होता. पृथ्वीऐवजी गुजरातने कुलवंत खेजरोलियाला समाविष्ट केलं.

आकाश दीप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आकाश दीप आघाडीचा गोलंदाज होता. मात्र पाठीचं दुखणं बळावल्यामुळे आकाश दीप स्पर्धेबाहेर गेला. आरसीबीसाठी हा मोठा धक्का होता. अचूक टप्प्यावर शिस्तबद्ध गोलंदाजी हे आकाश दीपचं वैशिष्ट्य आहे.

हर्षित राणा
कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हर्षित राणा प्रमुख गोलंदाज होता. हर्षितला झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. याच दुखापतीमुळे हर्षित टी२० वर्ल्डकपही खेळू शकला नव्हता.
मथिशा पथिराणा

वानिंदू हासारंगा
टी२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान वानिंदू हासारंगाच्या मांडीचे स्नायू दुखावले. त्यामुळे तो वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नाही. आयपीएलकरता एनओसी मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट देणं अनिवार्य करण्यात आलं होतं. हासारंगाने ही टेस्ट दिली नाही. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने हासारंगा येणार नसल्याचं स्पष्ट झालं. लखनौने २ कोटी रुपये खर्चून हासारंगाला ताफ्यात घेतलं होतं. तो संघाचा प्रमुख फिरकीपटू असणार होता. हासारंगाने नसल्याचं स्पष्ट झाल्यावर लखनौनं दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडला संघात घेतलं.

रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला. रोहितच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तो पाच सामने खेळू शकला नाही. रोहितच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसला. मुंबईचा संघ पराभवाच्या गर्तेत सापडला आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलची पाच जेतेपदं पटकावली आहेत. रोहितच्या नेतृत्वातच भारतीय संघाने २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला होता.

हार्दिक पंड्या
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या पाठीच्या दुखण्यामुळे काही लढती खेळू शकलेला नाही. सातत्याने होणाऱ्या पराभवांमुळे हार्दिकच्या नेतृत्वावर टीका होते आहे.

मोहसीन खान
लखनौचा उंचपुरा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन दुखापतीमुळे काही लढती खेळू शकला नाही.

अथर्व अंकोलेकर
U19 भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करणारा अथर्व मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे अथर्व खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. मुंबई इंडियन्स संघाने अथर्वऐवजी क्रिश भगतला संघात घेतलं. काही दिवसांपूर्वी फिट झालेला अथर्व ठाणे प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळताना दिसला.

मिचेल सँटनर
न्यूझीलंडचा टी२० कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला. सँटनरच्या डाव्या खांद्याला, डोक्याला दुखापत झाली. मात्र यातून सावरायला वेळ लागणार असल्याने सँटनर उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. सँटनरऐवजी मुंबई इंडियन्सने केशव महाराजला समाविष्ट केलं.

सॅम करन
लिलावापूर्वीच्या ट्रेडऑफमध्ये चेन्नईने रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोघांना राजस्थान रॉयल्सला दिलं. जांघेच्या दुखापतीमुळे सॅमने माघार घेतली. राजस्थानने सॅमऐवजी दासून शनकाला संघात घेतलं.

नुवान तुषारा
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी न मिळाल्याने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज न्यूवान तुषाराने न्यायालयात धाव घेतली. त्याने श्रीलंका क्रिकेटविरोधात याचिका दाखल केली. आयपीएलमध्ये एनओसी मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट देणं अनिवार्य आहे. तुषाराने ती दिली नाही. तुषाराने महिनाभरानंतर बोर्डाविरुद्धची याचिका मागे घेतली. श्रीलंका क्रिकेटची माफी मागितली. आरसीबीने तुषाराऐवजी रिचर्ड ग्लीसनला संघात घेतलं.

ब्रायडन कार्स
सरावादरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे ब्रायडन कार्स स्पर्धेबाहेर फेकला गेला. कार्स सनरायझर्स संघाचा भाग होता. कार्सऐवजी हैदराबादने दिलशान मधुशनकाला संघात समाविष्ट केलं.

जॅक एडवर्ड्स
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॅक एडवर्ड्ससाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने ३ कोटी रुपयांची बोली लावली. मात्र पायाला झालेल्या दुखापतीमुळे एडवर्ड्स संपूर्ण हंगाम खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. सनरायझर्सने जॅकऐवजी डेव्हिड पायनेची निवड केली.

डेव्हिड पायन
एडवर्ड्सऐवजी संघात आलेला डेव्हिड पायने काही सामने खेळला मात्र घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे तोही स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याऐवजी गुजरात टायटन्स संघाने गेराल्ड कुत्सियाला संघात समाविष्ट केलं.

शिवम मावी
सनरायझर्सच्या ताफ्यात असलेला युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी जांघेच्या दुखापतीमळे स्पर्धेबाहेर गेला. तो एकाही सामन्यात खेळला नव्हता. त्याच्याऐवजी शिवम अंबरीशची हैदराबादने निवड केली.

पॅट कमिन्स
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स भारतात दाखल झाला मात्र वैद्यकीय चाचण्यांमुळे मायदेशी परतला. फिटनेस टेस्ट दिल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला परवानगी दिली. कमिन्सला कारकिर्दीत सातत्याने पाठीच्या दुखण्याने सतावलं आहे. हेच दुखणं बळावल्यामुळे कमिन्स यंदा सात सामने खेळू शकला नाही.

मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीतून सावरत होता. रिहॅब प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे स्टार्क यंदाच्या हंगामातल्या सुरुवातीच्या ७ लढती खेळू शकला नाही. स्टार्कचं आगमन लांबणीवर गेल्याने त्याला जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं.

जोश हेझलवूड
दुखापतीतून सावरलेला जोश हेझलवूड आयपील खेळण्यासाठी भारतात दाखल झाला मात्र सावधानतेचा उपाय म्हणून तो दोन सामने खेळला नाही.

रजत पाटीदार
दुखापतीमुळे रविवारी पंजाबविरुद्धच्या लढतीत बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माने संघाचं नेतृत्व केलं.