मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला पुन्हा एकदा दुखापतीचा फटका बसला आहे. कर्नाटकविरुद्ध रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना, पृथ्वीच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारांसाठी पाठवण्यात आलं. मात्र त्याची दुखापत पाहिल्यानंतर तो भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

अवश्य वाचा – Ranji Trophy : तामिळनाडूविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघात बदल, आदित्य तरेकडे नेतृत्व

BCCI ने अधिकृत पत्रक जाहीर करत यासंदर्भातली माहिती दिली आहे. पृथ्वीवर सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. त्यामुळे भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी होऊ शकणार नसल्याचं बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. कर्नाटकविरुद्ध रणजी सामन्यात आपल्या सहकाऱ्याने केलेला ओव्हरथ्रो थांबवण्याच्या नादात पृथ्वीला दुखापत झाली होती. याआधी काही महिन्यांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्यामुळे पृथ्वीवर बंदी घालण्यात आली होती. यामधून सावरत पृथ्वीने चांगलं पुनरागमन केलं, मात्र पुन्हा एकदा तो दुखापतीच्या दुष्टचक्रात अडकला आहे. त्यामुळे आगामी काळात पृथ्वीला भारतीय संघाचं तिकीट कधी मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ranji Trophy : संकटात सापडलेल्या मुंबईला मिळाला ‘हिटमॅन’चा आधार