इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतल्या उरलेल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यासोबतच श्रेयस अय्यर IPL 2021 ला देखील मुकणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रेयसच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर श्रेयसनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये “मी लवकरच परत येईन”, असं वचन श्रेयसनं भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलं आहे.

काय म्हणाला श्रेयस ट्वीटमध्ये?

श्रेयस अय्यरनं केलेल्या ट्वीटमध्ये चाहत्यांचे आभार मानले आहेत. “मी तुम्हा सगळ्यांचे मेसेज वाचतोय. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी मनापासून आपला आभारी आहे. पण तुम्हाला माहितीये, जेवढा जोरदार झटका, तेवढंच ताकदीनं पुनरागमन (द ग्रेटर द सेटबॅक, द स्ट्राँगर द कमबॅक). मी लवकरच परत येईन!” असं श्रेयसनं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

 

श्रेयस अय्यरच्या दुखापतीचा टीम इंडियासोबतच त्याची आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सला देखील फटका बसला आहे. गेल्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालीच दिल्ली कॅपिटल्सनं झोकात आयपीएल फायनलपर्यंत धडक मारली होती. यामध्ये १७ सामन्यांमध्ये श्रेयसनं तब्बल ५१९ धावा कुटल्या होत्या. त्यामुळे आता दिल्लीच्या १० एप्रिलला होणाऱ्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना कसा करायचा, याची वेगळी रणनीती दिल्ली कॅपिटल्सला आखावी लागणार आहे.

Ind vs Eng: दणदणीत विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, दोन महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी