नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर खांद्याच्या दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

सध्या वॉशिंग्टन इंग्लंडमधील कौंटी संघ लँकशायरचे प्रतिनिधित्व करत आहे. रॉयल लंडन चषक एकदिवसीय स्पर्धेतील वूस्टरशायरविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉशिंग्टनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला काही दिवस लागू शकतील. त्यामुळे तो १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वॉशिंग्टनला गेल्या काही काळापासून दुखापतींनी सतावले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पायाच्या दुखापतीमुळे त्याला वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळता आले नाही. तसेच ‘आयपीएल’मध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली आणि सनरायजर्स हैदाबारादकडून तो केवळ नऊ सामने खेळू शकला. त्यापूर्वी जानेवारीमध्ये करोना झाल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेलाही मुकावे लागले होते.