देवेंद्र पांडे
दरवर्षी एप्रिल महिन्यात आयपीएलच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातले खेळाडू सर्वस्वी नव्या विश्वाला सामोरे जातात. पंचतारांकित हॉटेलं, विदेशी प्रशिक्षक, प्रचंड पैसा, झगमगाट, पार्टी या सगळ्याने ते भांबावून जातात. या सीरिजच्या माध्यमातून या विश्वाचा घेतलेला धांडोळा.
इश्वर पांडेने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सचा खेळाडू म्हणून हॉटेलात प्रवेश केला. नाव नोंदणीची प्रक्रिया करून तो स्वत:च्या खोलीत पोहोचला. पहिली गोष्ट त्याच्या नजरेस पडली ती म्हणजे बाथटब. ‘सगळ्यात आधी माहिती काढली की हा काय प्रकार आहे? बाथटब काय हे मला अजिबातच ठाऊक नव्हतं. यात बसून आंघोळ करायची की कशासाठी आहे ही वस्तू? टीव्हीवर पाहिली होती ही वस्तू पण यात पाणी कसं साठवायचं ते कळेना. मग कुणाला तरी विचारलं’. नंतर एसी दिसला. एसी थंड हवेसाठी असतो हे त्याला माहिती होतं पण त्याची बटनं कशी चालवायची ते कळेना. त्याला पुन्हा कुणाला तरी फोन करून विचारावं लागलं. ‘मी रीवा जवळच्या परिसरातला आहे. मी इतक्या मोठ्या हॉटेलात कधीच राहिलो नव्हतो. मला तर हे स्वर्गात गेल्यासारखंच होतं. एक बेल वाजवली की जे पाहिजे ते हजर होत असे’.
मध्य प्रदेशातल्या रीवा इथल्या कनिष्ठ मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असलेला इश्वर हा वेगवान गोलंदाज. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळताना फारतर थ्री स्टार हॉटेलात राहिला होता. मध्य प्रदेश संघातल्या सहकाऱ्यांबरोबरीने प्रवास करत असे. रुम शेअर करावी लागत असे. डोमेस्टिक सामन्यांना सुरक्षायंत्रणा नसते.हॉटेलातून स्टेडियमला जायला यायला एसी बस नसते. कोणी ढुंकूनही पाहत नाही. तुम्ही येताय जाताय कोणालाही काहीही पडलेली नसते.
आयपीएल ही एक वेगळीच दुनियादारी. एकट्यासाठी स्वतंत्र खोली, बाथटब. हरवून जायला होईल अशी लॉबी. अगम्य मजल्यांवर घेऊन जाणाऱ्या लिफ्ट्स. हॉटेल कसं आहे, तिथे कसं वावरायचं हे कळत नाही. छोट्या खेड्यातल्या माणसाला ही दुनिया हरवून टाकते.
झोपायला दिलेला बेड वेगळा. जेवण तर अगदीच वेगळं. सामन्यानंतर होणाऱ्या पार्टी हे तर वेगळंच जग.
‘आटपाट नगरी विश्व. अप्सरा आम्हाला पाहत आहेत. मोठंच प्रलोभन होतं. खूप खेळाडू या कारणामुळे भरकटत असत. ज्यांनी अशी दुनिया पाहिलेली नाही त्यांना वाटू लागे हेच खरं जग आहे. करिअर कुठल्या दिशेला चाललं आहे, ते स्वत:कुठे चालले आहेत ते कळत नसे. जेव्हाही एखादा सीनिअर याबाबत इशारा देत असे तेव्हा वाटे- हा स्वत पार्टी करतो आहे आणि मला हे असं जगायला मनाई करतो आहे. पण आता मागे वळून बघताना ते म्हणत होते ते बरोबर आहे असं वाटतं- हेच ते प्रलोभन’.
‘ड्रेसिंग रुम हे एक अनोखं कोडं. कहाँ कहाँ देखे असं व्हायचं. ज्यांना टीव्हीवर खेळताना पाहत मोठे झालो ती मंडळी बाजूला बसलेले असायची. आम्ही अवाक स्थितीत असायचो. शहरातले खेळाडू या सगळ्याशी पटकन जुळवून घ्यायचे, आम्हाला वेळ लागायचा. याविषयी कोणी बोलत नाही, सांगत नाही. तामझाम बघून डोळे दिपायचे. मुलं दबून जातात कारण हे जग त्यांनी कधीच पाहिलेलं नाही. पण मोठे खेळाडू, संघातले सहकारी त्यांनी हे जग अनुभवलेलं असतं. ते मदत करतात. सगळ्यात कठीण भाग म्हणजे भाषा’.
‘एक असा टप्पा येतो जेव्हा तुम्हाला भीती वाटते. मी बोलतोय ते बरोबर आहे का चूक अशी भीती असते. भाषा हा एक अडसर होऊन जातो. विदेशी खेळाडूबरोबर बाहेर जाता, बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलत असता. त्याला तुमचं म्हणणं समजतंय का कळत नाही’. पांडे बोलताना थांबतो. तो पुढे सांगतो, ‘पुण्याकडून खेळताना अॅलन डोनाल्ड आमच्या कोचिंग टीमचा भाग होता. पण मी त्याच्याशी मनमोकळेपणे बोलूच शकत नसे. मी त्याच्याशी बोलायला जायचो पण वाक्यच पूर्ण करू शकायचो नाही. त्याला असं वाटायचं मी माझं म्हणणं मांडू शकत नाही. मग मी बाकीच्यांची मदत घेऊन त्याच्याशी बोलत असे. जेव्हा टीम मीटिंग मध्ये ठरत असे की एखाद्या खेळाडूने बोलावं आणि आपलं नाव घेतलं गेलं तर अक्षरक्ष: घाम फुटत असे’.
१३५ ताशी वेगाने चेंडू टाकून प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या गोलंदाजाची पन्नासहून अधिक लोकांसमोर इंग्रजीत बोलताना तपतप होत असे. चेंडू त्याचा मित्र होता, भाषा नाही.
‘राज्य संघटनांपेक्षा फ्रँचाइजींनी समजून घेतलं. त्यांनी वर्षभर आमच्या फिटनेसचा आढावा घेतला.आमच्यासाठी व्यायामाचं वेळापत्रक ठरवलं. ट्रेनर्स उपलब्ध करून दिले. वैद्यकीय मदत पुरवली. कुलदीप सेन दुखापतग्रस्त झाला तेव्हा राजस्थान रॉयल्सने उपचाराचा खर्च केला. त्याला त्याचं मानधनही मिळालं. घरच्या माणसाप्रमाणे फ्रँचाइजी काळजी घेत असत. एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसेल तर त्याला पाठिंबा देत. राज्य संघटनांकडून अशी साथ मिळत नसे’.
‘कॉन्ट्रॅक्टपलीकडे ऋणानुबंध तयार होत. छोट्या गावातल्या खेळाडूला राज्य संघटनेकडून जो पाठिंबा-साथ मिळत नसे ती फ्रँचाइजींकडून मिळू लागली. फ्रँचाइजींकडून कोणाचा तरी विचारपूस करायला फोन येत असे. ते लक्ष ठेवत. राज्य संघटनांना तेवढा वेळ नसे पण फ्रँचाइजींभोवतालचं विश्व तुम्हाला हरवून टाकणारं असे. ग्लॅमर आणि घरच्यांसारखी साथ एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. बाथटब, अप्सरा हे सगळं एकाच हॉटेलात असे’.
पांडेची भारतीय संघात निवड झाली पण अंतिम अकरात संधी मिळाली नाही. आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि पुणे वॉरियर्स संघाकडून खेळला.
रीवात चित्र बदललं. आतापर्यंत त्या भागातल्या कोणाचीच भारतीय संघात निवड झाली नव्हती. लोक त्याला भेटायला येऊ लागले, त्याच्याबरोबर फोटो काढू लागले. त्यांच्यामुळे मला सेलिब्रेटी झाल्यासारखं वाटू लागे. बिल्डर मंडळी ब्रोशर घेऊन येत असत. आसपासच्या परिसरात उभ्या राहत असलेल्या हाऊसिंग प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ते त्याला गळ घालत. स्थानिक राजकारणी भेट घेत. अनेक अनोळखी माणसं भेटायला येत. या एवढ्या गर्दीला कसा आवरायचं कळायचं नाही. अनेकांना त्याचा चेहराही ठाऊक नसे पण भारतासाठी निवड झालेला क्रिकेटपटू इथे राहतो याचं अप्रूप असे. त्यामुळे मला भेटण्यासाठी वाट वाकडी करून ते येत असत.
रीवात तो एकमेव होता ज्याने भारतीय संघापर्यंत मजल मारली होती. आयपीएल संघाच्या खोलीत मात्र तो एकटाच असे- तिथल्या गोष्टी समजून घेण्यातच त्याचा बहुतांश वेळ जात असे. त्याने आयपीएल स्पर्धा अंतर्बाह्य पाहिली. गावाखेड्यातून, निमशहरातून मुलं येत, ज्यांना बाथटब, चकाचक हॉटेलचं विश्व माहिती आहे यांच्याप्रमाणे आयुष्य घडवण्यासाठी झटत असत. दरवर्षी लिलावा झाला की नव्या तरुणांची फौज आयपीएल ताफ्यात सामील होई. शहरं बदलत असत- कधी रीवा, कधी रायपूर, रांची. कधी उत्तर प्रदेशातलं अगदी टोकाचं गाव. गावं बदलत पण भांबावलेले चेहरे दरवर्षी दिसत राहत.
‘खेळाडूंना हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की त्यांचं सगळं लक्ष खेळावरच असायला हवं. खेळावरचं लक्ष हटलं की या सगळ्या गोष्टी बाजूला पडणार. क्रिकेट चांगलं खेळत असल्यामुळे आयपीएल संघात आहोत हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. आधी मला हे कळायचं नाही. क्रिकेट खेळतोय म्हणजे संघात घेतील असं नाही. सातत्याने चांगलं दर्जेदार खेळलात तरच संघात तुमची निवड होईल’.
इश्वरला आता पंचतारांकित हॉटेलचं विश्व सरावाचं झालं आहे. बाथटब त्याला वापरता येऊ लागला आहे. बाकी गोष्टी समजायला बराच वेळ लागला. दरवर्षी एप्रिल महिन्यात गावातला मुलगा पंचतारांकित हॉटेलातल्या खोलीत शिरतो. बाथटब आणि बाकी सगळं वातावरण पाहून भांबावून जातो.
