नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने प्रचलित होणाऱ्या ‘स्पिन सर्व्हिस’वरील बंदी पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने सुदिरमन करंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २९ मेपर्यंत अशा प्रकारच्या ‘सर्व्हिस’वर तात्पुरती बंदी आणली होती. मात्र, सोमवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ही बंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही अशा ‘सर्व्हिस’वर बंदी असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘स्पिन सर्व्हिस’च्या वापराबद्दल सविस्तर चर्चा केल्यानंतर ही बंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा-ऑलिम्पिकवर याचा परिणाम होणार नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीतही या ‘सर्व्हिस’च्या वापरावर निर्बंध असतील,’’ असे आंतरराष्ट्रीय संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

डेन्मार्कच्या मार्कस रिंडशोज या दुहेरीतील खेळाडूने अशा प्रकारची ‘सर्व्हिस’ प्रचलित आणली. अशा प्रकारची ‘सर्व्हिस’ करून प्रतिस्पर्धी खेळाडूस सहजपणे गोंधळात टाकून झटपट गुण वसूल करता येतात. अशी ‘सर्व्हिस’ करणे ही एक कला असून, अनेक खेळाडू ती झपाटय़ाने आत्मसात करत आहेत; पण अशी ‘सर्व्हिस’ अन्यायकारक असून त्यावर बंदी आवश्यक असल्याचा मतप्रवाह जोर धरून आहे.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे सचिव थॉमस लुंड यांनी बॅडमिंटनमधील बदल नक्कीच स्वागतार्ह असतील, पण त्यापूर्वी ते उपयुक्त किंवा गरजेचे आहेत हे सिद्ध व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. त्यामुळेच अजून तरी ‘स्पिन सर्व्हिस’बद्दल वेगळा नियम करण्यात आलेला नाही. सध्याच्या बॅडमिंटन नियमावलीतील ९.१.५ कलमानुसार ‘सर्व्हिस’ करणाऱ्या खेळाडूने शटल सरळ पकडूनच ‘सर्व्हिस’ करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे केलेली ‘सर्व्हिस’च सध्या ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International badminton federation decision to ban spin service till paris olympics amy
Show comments