||तुषार वैती, लोकसत्ता

आठवडय़ाची मुलाखत ; महेंद्र चव्हाण, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू

सातारा : गेली अनेक वर्षे मी ‘महाराष्ट्र-श्री’ किताब पटकावण्यासाठी मेहनत घेत होतो. अनेक वेळा मला विजेतेपदाने हुलकावणी दिली. तब्बल चार वेळा मी उपविजेतेपदापर्यंत येऊन पोहोचलो. पण आज किताब विजेतेपदासाठी माझे नाव घोषित झाल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. २००७ मध्ये मी पहिल्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धा खेळलो. आता तब्बल १३ वर्षांनंतर तपश्चर्येचे फळ मला मिळाले, अशी भावना ‘महाराष्ट्र-श्री’ किताबावर नाव कोरल्यानंतर पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने व्यक्त केली. महेंद्रशी केलेली ही बातचीत –

‘महाराष्ट्र-श्री’ किताब पटकावल्यानंतर तुझ्या भावना काय आहेत?

स्वप्नपूर्ती झाल्याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे. ‘आशिया-श्री’ आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर कुठे तरी ‘महाराष्ट्र-श्री’ आणि ‘भारत-श्री’ किताब न जिंकता आल्याची खंत वाटत होती. एकदा तरी ‘महाराष्ट्र-श्री’ किताब जिंकावा, अशी मनोमन इच्छा होती. आज ते स्वप्न साकार झाले. त्यामुळे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यापेक्षा अधिक आनंद होत आहे. समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. माझे प्रशिक्षक युनूस शेख यांच्यामुळेच मी इथवर मजल मारू शकलो. माझ्याकडून सर्वोत्तम मेहनत त्यांनी करवून घेतली होती.

आर्थिक परिस्थिती नसतानाही कुटुंबीयांचे दडपण कसे हाताळले?

अनेक जण या किताबासाठी वर्षांनुवर्षे मेहनत घेत असतात. गाडीचा हप्ता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबीयांचे दडपण यामुळे आर्थिक गणित जुळत नव्हते. तरीही अखेरच्या क्षणी ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेत उतरण्याचे मी ठरवले. त्यानंतर कुटुंबीयांचा पाठिंबाही मिळत गेला. स्वत:च्या आहारावर बरेचसे पैसे खर्च करण्याची परिस्थिती नसतानाही मी हे शिवधनुष्य उचलले. वाशी महापौर, गडहिंग्लज महाराष्ट्र-श्री अशा स्पर्धा जिंकत गेल्यानंतर माझा आत्मविश्वासही उंचावत गेला. त्यानंतर स्वत:च्या शरीरसंपदेवर अधिक भर देऊन मी विजेतेपद पटकावण्याचे उद्दिष्ट बाळगले होते.

 विजेतेपदासाठी कुणाचे आव्हान सर्वाधिक होते?

काही जण इतरांना हरवण्यासाठी स्पर्धेत उतरत असतात. पण मी विजेतेपद पटकावण्यासाठी आणि माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या चाहत्यांना विजेतेपदाची भेट देण्यासाठी स्पर्धेत उतरत असतो. सहा वेळा ‘महाराष्ट्र-श्री’ पटकावणारा सुनित जाधव यंदा केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाल्यामुळे त्याचे आव्हान सुरुवातीलाच बाद झाले होते. पण अनिल बिलावा चांगल्या तयारीत असला तरी त्याचे दडपण माझ्यासमोर नव्हते. कोणत्याही परिस्थितीत विजयश्री खेचून आणायची, याच उद्देशाने मी शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत होते. चार दिवस पाण्याचा एकही थेंब पोटात नसल्यामुळे मला स्टेजवरच चक्कर आली, पण त्यातूनही बाहेर पडत किताब पटकावल्याचा आनंद होत आहे.

आता ‘भारत-श्री’ स्पर्धेसाठी कशी तयारी सुरू आहे?

‘भारत-श्री’ स्पर्धा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपल्याने त्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर असेल. ‘महाराष्ट्र-श्री’ पटकावणारा खेळाडूच ‘भारत-श्री’चा विजेता ठरतो, असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेवर लागलेले असते. आता जय्यत तयारी करून सर्वोत्तम कामगिरी सादर करत त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा माझा मानस आहे.