पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सोमवारी तातडीने इंझमामवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रीया करण्यात आली. या शस्त्रक्रीयेनंतर इंझमामची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
इंझमामला मागील काही दिवसांपासून छातीत कळा येत होत्या. प्राथमिक चाचण्यांचे सर्व अहवाल सामन्य आले. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचं निष्पन्न झाल्याचं ईएसपीएन क्रिकइन्फोने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

या चाचणीनंतर इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्याने दिलीय.

५१ वर्षीय इंझमाम हा पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३७५ सामन्यांमध्ये एकूण ११ हजार ७०१ धावा केल्यात. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या यादीत इंझमाम तिसऱ्या स्थानी आहे. कसोटीमध्ये ११९ सामन्यांमध्ये त्याने ८ हजार ८२९ धावा केल्यात. तो पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

२००७ साली इंझमाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेटशीसंबंधित अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तो आधी पाकिस्तानच्या संघासाठी फलंदाजी सल्लागार होता. नंतर २०१६ ते २०१९ दरम्यान तो पाकिस्तानी संघ निवडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख निवडकर्ता म्हणून कार्यरत होता. इंझमामने अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.