भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन.रामचंद्रन यांनी हॉकी इंडियाचे प्रमुख नरिंदर बात्रा यांच्याविरुद्ध दहा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे जाहीर केले आहे. अध्यक्षपदी राहण्यासाठी रामचंद्रन यांनी मला लाच देण्याची तयारी दर्शवली होती असे बात्रा यांनी नुकतेच जाहीररीत्या सांगितले होते.
अध्यक्षपदी असताना रामचंद्रन यांनी प्रतिवर्षी एक कोटी रुपयांची लाच देण्याचे प्रलोभन दाखविले होते, असे बात्रा यांनी सांगितले होते. त्यांच्या या आरोपांचे खंडन करीत रामचंद्रन यांचे कायदेशीर सल्लागार हरीशंकर मणी यांनी सांगितले, बात्रा यांनी आपल्या अशिलास बदनाम करण्यासाठीच हे आरोप केले आहेत. त्यांनी पंधरा दिवसांत बिनशर्त जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला जाईल. बात्रा यांनी केलेल्या विधानामुळे रामचंद्रन यांच्या प्रतिष्ठेस धक्का पोहोचला आहे. रामचंद्रन यांना आयओए, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये सन्मानाचे स्थान आहे. बात्रा यांनी बिनबुडाचे आरोप करीत माझ्या अशिलांच्या प्रतिमेस धक्का दिला आहे.
मणी यांनी बात्रा यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये पुढे म्हटले आहे की, जर बात्रा यांनी ताबडतोब आपले आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क माझ्या अशिलांना आहे.
बात्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, रामचंद्रन यांनी माझ्याविरुद्ध खटला दाखल करण्याचे धाडस दाखवावे. त्यास सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. त्यांनी पाठविलेल्या नोटिशीला माझ्या वकिलांकडून योग्य उत्तर दिले जाईल. मी केलेल्या आरोपांबाबत माझ्याकडे सबळ पुरावा आहे.तसेच व्हिडीओ चित्रीकरणही आहे. आयओएच्या नीतिमूल्ये समितीला वस्तुस्थिती कळविली जाणारच आहे. आता तर हे प्रकरण सर्व लोकांसमोर येणार असल्यामुळे मला समाधान वाटत आहे.’