ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा पुनर्प्रवेश झाल्यामुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त उत्साहित झाला आहे. मात्र याचवेळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अंतर्गत भांडणे मिटवावी आणि खेळाडूंना तिरंग्याचे प्रतिनिधित्व करू द्यावे, असे आवाहन योगेश्वर दत्तने म्हटले आहे.
‘‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए)ने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती(आयओसी)सोबतचे वाद लवकरात लवकर मिटवावेत. या वादाचा फटका भारतीय क्रीडापटूंना बसला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतीय क्रीडापटूंना ऑलिम्पिकच्या झेंडय़ाखाली खेळावे लागत आहे,’’ असे योगेश्वरने पुढे सांगितले.
‘‘कुस्तीचा ऑलिम्पिक प्रवेश ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. या निर्णयामुळे नरसिंग यादव, अमित कुमार, बजरंग आणि यासारख्या उदयोन्मुख कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळणार आहे. कुस्तीकडे वळणाऱ्या खेळाडूंमध्ये वाढ होईल. परंतु ऑलिम्पिकइतकीच विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय झेंडय़ाखाली खेळण्याची संधी ही अनोखी प्रेरणा देते. खेळाडूंना ही संधी मिळवून देणे आयओएच्या हाती आहे,’’ असे योगेश्वरने सांगितले.
‘‘भारतीय क्रीडाविश्वाला चालना मिळेल अशी पारदर्शक कामकाज करणारी प्रभावी ऑलिम्पिक संघटना आवश्यक आहे. भारतीय खेळांची प्रतिमा स्वच्छ असावी असे आम्हाला वाटते. आयओए आणि आयओसी यांच्यातील वादात आम्हाला पडायचे नाही. आम्हाला भारतासाठी खेळायचे आहे, देशासाठी पदक मिळवायचे आहे. ऑलिम्पिकच्या झेंडय़ाखाली खेळताना आम्हाला खूप निराशाजनक आणि अपमानास्पद वाटते,’’ असे त्याने स्पष्ट केले.
आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तीला आयओएच्या निवडणुकीत सहभागी होण्यास बंदी घालावी का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास योगेश्वरने नकार दिला.