भारतीय क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीला गाजणारं नाव म्हणजे क्रिकेटर विराट कोहली. एकदिवसीय, कसोटी आणि टी२० प्रकारात आपला ठसा उमटवणाऱ्या विराटला यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. आयपीएलच्या १० व्या पर्वात विराटच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अनेकांनीच त्याच्या सध्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण, या सर्व टीकांकडे दुर्लक्ष करत विराटने यावर एक चांगला मार्ग शोधून काढला.

१ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी रवाना होण्यापूर्वी विराटने ग्रेटर नोएडा येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’वर स्पीड कार चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. यावेळी विराटने सर्वसामान्य कार चालवतानाची वेगमर्यादा ओलांडत थेट ताशी २८० किमीचा वेग गाठला होता. ‘ऑडी ८ स्पोर्ट्स कार’ चालवण्याच्या या अनुभवाविषयी सांगताना विराटने आपण याआधीही अशा प्रकारे तुफान वेगाने कार चालवल्याचं सांगितलं. ‘मी यापूर्वी ताशी २९० किमीच्या वेगानेही कार चालवली आहे. खरंतर त्यावेळी मी फार घाबरलो होतो. कारण, ज्या प्रमाणे प्रोफेशलन ड्रायव्हर्स कारवर शेवटच्या क्षणी नियंत्रण ठेवतात तसं काही मला जमलं नव्हतं’, असं विराट ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

‘बुद्ध इंटनॅशनल सर्किट’वर ‘ऑडी ८ स्पोर्ट्स कार’ चालवण्याचा आनंद घेणाऱ्या विराटने यावेळी क्रिकेटशी निगडीत कोणत्याताही प्रश्नांचं उत्तर दिलं नाही. आयपीएलमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर विराटने काही दिवस त्याविषयी न बोलण्याचं ठरवलं आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामामध्ये गतवर्षीच्या विजेत्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ या सांघाला अंकतालिकेत अगदी शेवटचं स्थान मिळालं आहे. त्यामुळेच विराटवर या सर्व गोष्टींचा ताण आल्याचं म्हटलं जात होतं.

वाचा: चॅम्पियन्स स्पर्धेत विराटला सूर सापडेल

सध्या विराट दिल्लीमध्ये असून, कुटुंबासोबत तो काही क्षण व्यतित करत आहे. मुळचा दिल्लीचाच असल्यामुळे विराट आणि दिल्ली हे एक भन्नाट समीकरण तयार झालंय. पण, दिल्लीतील वाहतूक कोंडीची समस्या त्याच्यासाठीसुद्धा डोकेदुखी ठरत आहे हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. ‘जेव्हा मी दिल्लीत असतो तेव्हा जास्त वेळ घरात बसून गाणी ऐकत व्यतित करतो’, असं तो म्हणाला. त्यासोबतच रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचं वाहन चालवताना प्रत्येक चालकाने इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करावा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहनही त्याने सर्वांना केलं.