गेल्या अनेक सामन्यांमध्ये पराभवाचा पाढा रेटत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ शुक्रवारी पुन्हा एकदा तोंडघशी पडला. घरच्या मैदानात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात कोहलीच्या बेंगळुरूला अवघं १३९ धावांचं लक्ष्य देखील गाठता आलं नाही. पंजाबने बेंगळुरूचा ११९ धावांतच खुर्दा उडवला. या स्पर्धेत बेंगळुरूचा हा १२ सामन्यांमधील ९ वा पराभव ठरला.  खरंतर सामन्याची नाणेफेक जिंकून बेंगळुरूने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंजाबला अवघ्या १३८ धावांमध्ये रोखलं होतं.

फलंदाजी ही जमेची बाजू असलेला बेंगळुरूचा संघ हे कमकुवत आव्हान सहज गाठेल आणि पराभवाचा दुष्काळ संपुष्टात आणेल अशी अपेक्षा असताना आज पुन्हा बेंगळुरूच्या फलंदाजांनी निराशा केली. कोहली, ख्रिस गेल, डीव्हिलियर्स, केदार जाधव अशा एकापेक्षा एक मातब्बर योद्धांनी पंजाबच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. ख्रिस गेल तर खातेही न उघडता तंबूत दाखल झाला, तर कोहली(९) त्याच्या पुढच्याच षटकात बाद झाला. पुढे संदीप शर्माने डीव्हिलिर्यचा काटा काढला. तर केदार जाधवलाही त्याने स्वस्तात बाद केले. संदीप शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. बाद फेरीसाठी दावेदारी सिद्ध करण्याच्या दृष्टीने पंजाबसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. सामन्यात विजय प्राप्त करून पंजाबने बाद फेरीसाठीची लढत आणखी चुरशीची केली आहे.

तत्पूर्वी, बेंगळुरूने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीचा निर्णय सार्थ ठरवत बेंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना वेसण घातली होती. हशीम अमला तर केवळ १ धाव काढून बाद झाला. तर गप्तीलही(९) स्वस्तात माघारी परतला होता. पंजाबला सुरूवातीलाच दोन धक्के देऊन बेंगळुरूला दबाव निर्माण करण्यात यश आले होते . पुढे शॉन मार्शने(२५) धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. मनन वोहरा आणि वृद्धीमान साहा देखील चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने १९ धावा वसुल केल्या. त्यामुळे पंजाबला १३८ धावांपर्यंत तरी मजल मारता आली होती.