जबरदस्त फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला १५५ धावांवर रोखण्यात रायझिंग पुणे सुपरजाएंट्सच्या गोलंदाजांना यश मिळाल्यानंतर सलामीवीर राहुल त्रिपाठीने आपली झलक दाखवली. रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर त्रिपाठीने संघाच्या धावसंख्येची धुरा सांभाळून कोलकाताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्रिपाठीने ५२ चेंडूत ९३ धावांची झंझावाती खेळी साकारली. यात त्याने सात खणखणीत षटकार आणि ९ चौकार ठोकले. रहाणे, धोनी, स्टोक्स, स्मिथ हे दिग्गज स्वस्तात तंबूत दाखल झाले असतानाही आत्मविश्वास न गमावता त्रिपाठीने दमदार फलंदाजी केली. रहाणे, धोनी, स्मिथ आणि मनोज तिवारी यांना तर दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही. एकट्या त्रिपाठीच्या खेळीवर पुण्याने आज कोलकातावर मात केली.

तत्पूर्वी, सामन्याची नाणेफेक जिंकून पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पुण्याच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी केली. पुण्याकडून जयदेव उनाडकट आणि वॉश्गिंटन सुंदरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. स्टोक्स, इम्रान ताहीर आणि ख्रिश्चन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पुण्याच्या अचूक माऱ्यासमोर कोलकाताच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही.वीस षटकांच्या अखेरीस ८ विकेट्सच्या मोबदल्यात कोलकाताला केवळ १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली.