केन विल्यमसनची तडाखेबाज खेळी त्यास शिखर धवनने दिलेली कमालीची साथ या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला ५ बाद १७६ धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात सनरायझर्सने १५ धावांनी विजय प्राप्त केला.

सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाला होता. त्यामुळे संघाचं काय होणार अशी चिंता असताना केन विल्यमसनने आपल्या पहिल्याच सामन्यात केवळ ५१ चेंडूत ८९ धावांची वादळी खेळी साकारली. यात विल्यमसनने पाच खणखणीत षटकार, तर  सहा चौकार ठोकले. विल्यमसन आणि धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. विल्यमसन बाद झाल्यानंतर धवनने फटकेबाजी सुरूच ठेवली. पण सामन्याच्या १९ व्या षटकात मोठा फटका मारताना धवन ७० धावांवर झेलबाद झाला. त्या पुढच्याच चेंडूवर युवराज सिंग (३) क्लीनबोल्ड झाला. युवी बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या ४ बाद १७० अशी होती. मग अखेरच्या षटकात हेन्रीकस आणि हुडाने फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला १९१ पर्यंत पोहोचवले.

प्रत्युत्तरात दिल्लीची सुरूवात निराशाजनक झाली होती. बिलिंग्ज(९) याला मोहम्मद सिराजने बाद केले. पण सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनने कोणताही दबाव निर्माण न होऊ देता झुंज सुरू ठेवली. त्याला करुण नायरनेही(३३) सुरूवातीला चांगली साथ दिली. पण नायर धावचीत झाला. मोहम्मद सिराजने संघाला संजू सॅमसनच्या रुपात महत्त्वपूर्ण यश मिळवून देत दिल्लीच्या विजयी आशांना सुरूंग लावण्यास सुरूवात केली. पुढे श्रेयश अय्यरने हार न मानता जशास तसे प्रत्युत्तर देत अर्धशतकी खेळी साकारून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. मात्र, अखेरीस सनरायझर्सच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करून दिल्लीला रोखले.