इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक १४.५ कोटींची बोली मिळाली. या किमतीपेक्षा स्टोक्स उत्सुक आहे तो नवनिर्वाचित कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यासह खेळण्यासाठी.

‘‘धोनी आणि स्मिथ यांच्याबरोबर रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघात खेळायला मिळणे, हा माझा बहुमान आहे. धोनी हा क्रिकेट जगतातील महान खेळाडू आहे, त्याचबरोबर स्मिथही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. स्मिथविरुद्ध खेळताना बऱ्याच वेळा आक्रमक खेळ माझ्याकडून झाला आहे. आता त्याच्याबरोबर खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे स्टोक्सने सांगितले.

गेल्या वर्षांत इंग्लंडला कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण या सामन्यांमध्ये स्टोक्सची कामगिरी लक्षणीय झाली होती.

‘‘पुण्याचे मैदान माझ्यासाठी घरच्यासारखेच आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात या मैदानात माझ्याकडून चांगली कामगिरी झाली होती. त्यामुळे या मैदानात खेळताना मला फायदा होईल. आयपीएलमधील अखेरच्या काही सामन्यांना मला मुकावे लागणार आहे. पण जास्तीत जास्त खेळण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे स्टोक्स म्हणाला.

या लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंना चांगला भाव मिळाला. स्टोक्सनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला १२ कोटी रुपयांचा दुसरा सर्वाधिक भाव मिळाला. यापुढे आयपीएलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या वाढेल, अशी आशा स्टोक्सने व्यक्त केली.

आयपीएलसाठी स्टोक्स, वोक्सची आर्यलडविरुद्ध माघार

आयपीएलच्या लिलावात विक्रमी बोलीसह लक्ष वेधून घेणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सने आर्यलडविरुद्ध होणाऱ्या दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. आयपीएलमधील सर्व सामने खेळण्याच्या हेतूने रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या स्टोक्सने हे पाऊल उचलले आहे. याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचा जोस बटलर आणि कोलकाता नाइट रायडर्सचा ख्रिस वोक्स यांनीसुद्धा आपण आर्यलडविरुद्धच्या मालिकेसाठी अनुपलब्ध असल्याचे कळवले.