scorecardresearch

IPL 2018 – दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्सचा नवीन कर्णधार

रॉबिन उथप्पा संघाचा उप-कर्णधार

दिनेश कार्तिक (संग्रहीत छायाचित्र)

आयपीएलच्या अकराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक याच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलेलं आहे. अकराव्या हंगामात कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीर पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघाचं म्हणजेच दिल्ली डेअरडेविल्सचं प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे नवीन हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र संघ व्यवस्थापनाने दिनेश कार्तिकच्या पारड्यात आपलं मत टाकलेलं आहे.

अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने दिनेश कार्तिकवर ७.४ कोटी रुपयांची बोली लावली होती. दिनेश कार्तिकसोबत रॉबिन उथप्पाही कोलकात्याच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र अखेर दिनेश कार्तिकने यामध्ये बाजी मारली आहे. रॉबिन उथप्पाला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

२०१७ साली गुजरात संघाकडून खेळताना दिनेश कार्तिकने ३६.१ च्या सरासरीने ३६१ धावा काढल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत आयपीएलमधला अनुभव आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव पाहता आम्ही दिनेशकडे संघाचं नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं, संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोलकाता नाईट रायडर्सने यासंदर्भातली घोषणाही केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याची दिनेश कार्तिकची ही पहिलीच वेळ असणार आहे. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूच्या संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव दिनेश कार्तिककडे आहे. दिनेशच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूच्या संघाने २००९-१० साली विजय हजारे चषकाचं विजेतेपद पटकावलं होतं.

असा असेल कोलकाता नाईट रायडर्सचा संघ –

दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा (उप-कर्णधार), सुनील नरीन, अँड्रे रसेल, ख्रिस लीन, मिचेल स्टार्क, कुलदीप सिंह यादव, पियुष चावला, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शिवम मवी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंह, कॅमरुन डेलपोर्ट, जेवॉन सिअरलेस, अपुर्व वानखेडे, इशांक जग्गी

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ ( Ipl2018 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2018 dinesh karthik made kolkata knight riders captain for 11th season

ताज्या बातम्या