|| प्रशांत केणी

महेंद्रसिंह धोनी एक यशस्वी कर्णधार आणि आदर्श क्रिकेटपटू म्हणून ओळखला जायचा. परंतु तो एक वेगळेच रसायन आहे, असे त्याच्याविषयी कौतुकाने म्हटले जायचे. परंतु इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) ताज्या घटनेने क्रिकेटजगतासाठी आदर्शवत असलेल्या धोनीची कारकीर्द शेवटाकडे जात असताना डागाळली आहे.

काही दिवसांपूर्वी पंचांचा निर्णय चुकल्यानंतर विराट कोहलीने तोफ डागली होती. पंचांनी डोळे उघडे ठेवावेत, हे ‘आयपीएल’ आहे, क्लब क्रिकेटचे सामने नाहीत, अशा शब्दांत कोहलीने ताशेरे ओढले होते. नेमके हेच भान धोनीसुद्धा विसरला. त्याने क्रिकेटमधील ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ म्हणून आदर्शवत वाटणारी सीमारेषा ओलांडली आणि गल्लीतल्या सामन्यांप्रमाणे चिडून मैदानावर जात थेट पंचांनाच जाब विचारला. त्याचे हे वागणे, त्याच्या आतापर्यंतच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असेच होते. कारण पंचांचा निर्णय हा प्रत्येक खेळाडूला बांधील असतो. त्यासाठी मैदानावर जाऊन त्यांना सवाल विचारण्याइतपत धोनीची मजल जाईल, असे कुणालाही ‘न भूतो, न भविष्यति’ वाटले नव्हते. याबाबत, धोनी आपल्या देशात काहीही करू शकतो, अशी टीकेची संधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने अचूक साधली.

शांत, संयमी, सामना जिंकून देण्यात तरबेज, विजयवीर, विजयानंतरचा आनंद किंवा पराभवानंतरच्या नैराश्यप्रसंगी तोल ढळू न देणारा, संघातील अन्य खेळाडूंना कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहक, यशाचे श्रेय सहकाऱ्यांना देणारा, सांघिकता जपणारा, अष्टपैलू, प्रेरणादायी, प्रामाणिक, ‘हेलिकॉप्टर’ फटक्याचा जनक, कठीण प्रसंगात बुद्धिबळाप्रमाणे मैदानावर चाली रचून डाव जिंकून देणारा अवलिया म्हणजेच धोनी. त्यामुळेच ‘रांचीचा राजपुत्र’, ‘द गेट्र फिनिशर’, ‘कॅप्टन कुल’ अशी अनेक बिरुदे त्याने प्राप्त केली. देशाला २००७ मध्ये ट्वेन्टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्याची किमया साधणाऱ्या धोनीने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थानही गाठून दिले. २०१५चा विश्वचषक चालू असताना भारतात त्याच्या कन्येचा जन्म झाला; परंतु ‘मी राष्ट्रीय कर्तव्यावर आहे, बाकीचे सर्व नंतर’ असा बाणा जपत त्याने विश्वचषक स्पध्रेवर लक्ष केंद्रित केले.

इतकेच नव्हे, तर २०११ मध्ये ट्रेंट ब्रीज कसोटीत इयान बेल वादग्रस्त पद्धतीने धावचीत झाल्यानंतर त्याला पुन्हा फलंदाजी करायला लावून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) खेळभावना पुरस्कारही त्याने जिंकला होता.

शेरेबाजी हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अस्त्र. इंग्लंडचा संघ कायमच भारतीयांना कमी लेखतो. या सर्व संघांच्या आक्रमक स्वभावाला तितक्याच त्वेषानं उत्तर देण्यासाठी भारताकडे आक्रमक संघनायक हवा, असे बऱ्याच मंडळींना वाटत होते; पण धोनी शांतपणे या हेकेखोर प्रतिस्पध्र्याना सामोरा जायचा. त्यामुळे झारखंडला क्रिकेटच्या नकाशावर स्थान मिळवून देणाऱ्या धोनीविषयी जागतिक क्रिकेटमध्ये आदराची भावना होती.

परंतु धोनीचा पारा चढल्याचे हे पहिलेच उदाहरण मुळीच नाही. २०१२ मध्ये सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर धोनीने मायकेल हसीला धावचीत केले. याबाबत ब्रूस ओक्झेनफोर्ड या तिसऱ्या पंचांनी हसीला बाद असल्याचा कौल दिल्यानंतर भारतीय संघाने जल्लोषसुद्धा केला; परंतु क्षणार्धात हा निर्णय चुकून दिला गेल्याचे सांगत मैदानावरील पंच बिली बोडेन आणि स्टीव्ह डेव्हिस यांनी ड्रेसिंगरूममध्ये जाणाऱ्या हसीला माघारी बोलावले. मग धोनीने बोडेन आणि डेव्हिस यांच्याशी या निर्णयाबाबत हुज्जत घातली. त्यानंतर, २०१३ मध्ये मोहालीत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इशांत शर्माने केव्हिन पीटरसनला पायचीत केल्याचे अपील पंच सुधीर असनानी यांनी फेटाळले होते. त्यावर धोनीने त्यांच्याकडे जाऊन योग्य न्याय देण्याची मागणी केली होती. हा चेंडू उजव्या यष्टीबाहेरच्या दिशेने जात होता, असे असनानी यांचे म्हणणे होते; परंतु धोनीच्या संतप्त मागणीमुळे चाहत्यांचा रोषसुद्धा पंचांना पत्करावा लागला होता.

सध्या विश्वचषक स्पर्धा दीड महिन्यांच्या अंतरावर आली असताना क्रिकेटपटू ‘आयपीएल’चे अविरत सामने खेळत आहेत. या वेळी खेळाच्या ताणाची चर्चा ऐरणीवर आहे. दोनच दिवसांपूर्वी धोनीने सामन्यानंतर शहरस्थलांतर करताना पत्नीसह विमानतळावरील जमिनीवरच झोप घेतल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकले होते. त्याच्यावरील खेळाचा ताणच यातून अधोरेखित होतो. धोनीसाठी ही अखेरची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्या यष्टिरक्षक-फलंदाज या स्थानाला आव्हान देऊ शकतील, असे पर्याय भारतीय क्रिकेटमध्ये नावारूपाला येऊ लागले आहेत. त्यामुळे एक प्रकारचे मानसिक नैराश्यसुद्धा त्याच्यावर येऊ लागले आहे. त्यातूनच धोनीला स्वत:वरील नियंत्रण ठेवता आले नसल्याचे म्हटले जात आहे.

तूर्तास, क्रिकेटजगतात धोनीच्या चुकीच्या वागण्याबाबत आणि त्याला सामन्याचे निम्मे मानधन देण्याच्या क्षुल्लक दंडात्मक कारवाईची चर्चा केली जात आहे. काही वर्षांपूर्वी धोनी म्हणाला होता की, ‘‘एखादी चूक पुन्हा होणार नाही, हे शिकणे आयुष्यात महत्त्वाचे असते. लोकांनी मला फक्त चांगला क्रिकेटपटू नव्हे, तर चांगला व्यक्ती म्हणूनही लक्षात ठेवावे.’’ परंतु आता निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या धोनीच्या कृतीमुळे अनेकांच्या मनात जपलेल्या त्याच्या आदर्श प्रतिमेला मात्र तडा गेला आहे.

prashant.keni@expressindia.com