आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचे अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईवर मात करत चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली. मात्र मुंबई इंडियन्सच्या या विजयोत्सवाला गालबोट लागलं आहे. फलंदाजीदरम्यान पंचांनी दिलेला निर्णय न पटल्यामुळे नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवणाऱ्या पोलार्डवर कारवाई करण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी पोलार्डच्या मानधनातली २५ टक्के रक्कम कापून घेतली आहे. पोलार्डकडून आयसीसीच्या Level 1 2.8 नियमाचं उल्लंघन झाल्याचं सामनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या सलामीवीरांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र रोहित आणि डी-कॉक माघारी परतल्यानंतर मुंबईचा डाव घसरला. मधल्या फळीत कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी संघाचा डाव सावरला. ड्वेन ब्राव्होच्या अखेरच्या षटकात, टाकलेला वाईड बॉल पंच नितीन मेनन यांनी वैध ठरवला. यामुळे नाराज झालेल्या पोलार्डने पुढचा चेंडू वाईड लाईनच्या समोर जाऊन खेळत ब्राव्होचा सूर बिघडवला. यानंतर दुसरे पंच इयान गुल्ड आणि नितीन मेनन यांनी पोलार्डशी चर्चा करत त्याला खेळ सुरु ठेवण्याची समज दिली. त्याचं हेच वागण आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, चेन्नईकडून शेन वॉटसनने आक्रमक अर्धशतकी खेळी करत चेन्नईला विजयाच्या जवळ आणून सोडलं होतं. मात्र अंतिम षटकात लसिथ मलिंगाने भेदक मारा करत चेन्नईच्या हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला.

अवश्य वाचा – IPL 2019 : अंतिम सामन्यातही निकृष्ट अंपायरिंग, पोलार्डचा मैदानातच निषेध