आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्यात मैदानात 10 धावांनी मात करत बंगळुरुने धडाकेबाज कामगिरी केली आहे. २१४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. नितीश आणि रसेल या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या.

त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आज आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

23:52 (IST)19 Apr 2019
अखेरच्या षटकात आंद्रे रसेल माघारी, बंगळुरु सामन्यात विजयी

कोलकात्यावर १० धावांनी केली मात. नितीश राणा, आंद्रे रसेलची अर्धशतकी खेळी

23:18 (IST)19 Apr 2019
नितीश राणाचं अर्धशतक

कोलकात्याची झुंज सुरुच

22:59 (IST)19 Apr 2019
कोलकात्याला चौथा धक्का, रॉबिन उथप्पा माघारी

मार्कस स्टॉयनिसने घेतला बळी

22:21 (IST)19 Apr 2019
शुभमन गिल माघारी, कोलकात्याला तिसरा धक्का

डेल स्टेनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला झेल

22:14 (IST)19 Apr 2019
कोलकात्याला दुसरा धक्का, सुनील नरिन माघारी

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेलने घेतला झेल

22:07 (IST)19 Apr 2019
कोलकात्याला पहिला धक्का, ख्रिस लीन माघारी

९ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या डेल स्टेनला मिळाला बळी

21:43 (IST)19 Apr 2019
बंगळुरुची २१३ धावांपर्यंत मजल

कोलकात्याला विजयासाठी २१४ धावांचं आव्हान

21:42 (IST)19 Apr 2019
अखेरच्या षटकात विराट कोहलीचं शतक पूर्ण

मात्र शेवटच्या चेंडूवर विराट झेलबाद होऊन माघारी, बंगळुरुचा चौथा गडी बाद

21:19 (IST)19 Apr 2019
मोईन अली माघारी, बंगळुरुला तिसरा धक्का

मोईनची आक्रमक खेळी संपुष्टात

21:18 (IST)19 Apr 2019
विराट पाठोपाठ मोईन अलीचंही अर्धशतक

कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेत मोईनने अर्धशतक झळकावत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली आहे

21:09 (IST)19 Apr 2019
विराट कोहलीचं अर्धशतक, बंगळुरुची झुंज सुरुच

कर्णधार विराटने मोईन अलीच्या साथीने महत्वाची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला आहे

20:44 (IST)19 Apr 2019
बंगळुरुला दुसरा धक्का, अक्षदीप नाथ माघारी

आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाने घेतला झेल

20:18 (IST)19 Apr 2019
बंगळुरुला पहिला धक्का, पार्थिव पटेल माघारी

सुनील नरीनने घेतला पहिला बळी

19:41 (IST)19 Apr 2019
कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

कोलकात्याच्या संघात कोणतेही बदल नाहीत,  बंगळुरुच्या संघात दोन महत्वाचे बदल

डेल स्टेनचं बंगळुरुच्या संघात पुनरागमन