IPL 2019 KXIP vs RCB : सलामीवीर ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना १७३ धावांपर्यंत मजल मारली. ख्रिस गेलने ६४ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तब्बल १० चौकार आणि ५ षटकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर त्याला शतकाची ५ धावांची गरज होती. पण त्याला केवळ चौकार मिळवता आला.

गेलला बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात शतक करता आले नाही, पण गेलने एका वेगळ्या पद्धतीने शतक केलं. टी २० क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक धावा १०० वेळा करण्याचा विक्रम त्याने केला. असा विक्रम करणारा तो पहिलावहिला खेळाडू ठरला. हा पराक्रम त्याने ३७० डावांमध्ये केला. ५०हून अधिक धावा १०० वेळा करताना त्यातील २१ वेळा त्याला त्याचे शतकात रूपांतर करता आले. तर ७९ वेळा त्याला शतकाने हुलकावणी दिली.

दरम्यान, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल जोडीने पंजाबच्या डावाची अतिशय आक्रमक सुरुवात करुन दिली होती. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत आपल्या विकेट फेकल्या. यामुळे मधल्या षटकांमध्ये पंजाबची धावगती मंदावली. मात्र ख्रिस गेलने अखेरच्या षटकांमध्ये आपला दाणपट्टा चालवत संघाला 173 धावांचा पल्ला गाठून दिला. बंगळुरुला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी 174 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावांची खेळी केली

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करम्याचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासून बंगळुरुवर हल्ला चढवला. विशेषकरुन ख्रिस गेलने सर्वा गोलंदाजांची धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत गेलने झटपट धावा जमवल्या. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल, सरफराज खान आणि सॅम करन झटपट बाद झाले. यावेळी गेलने स्वतःवर संयम ठेवत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने मनदीप सिंहने त्याला चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांत केलेल्या याच फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने 2, तर मोहम्मद सिराज आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.