Video : एका षटकात गेलने कुटल्या २४ धावा; संघाच्या मालकीणबाईही झाल्या खुश

गेलने त्या षटकात केली चौकार- षटकारांची आतषबाजी

IPL 2019 KXIP vs RCB : पंजाबच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात सलामीवीर ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १७३ धावांपर्यंत मजल मारली. ख्रिस गेलने ६४ चेंडूत ९९ धावांची खेळी केली आणि उपस्थितांची मने जिंकली. या खेळीमध्ये त्याने तब्बल १० चौकार आणि ५ षटकार ठोकले. या सामन्याच्या एका षटकात गेलची फटकेबाजी पाहून संघाच्या मालकीणबाई म्हणजेच प्रीती झिंटादेखील खुश झालेली दिसली.

सहावे षटक घेऊन मोहम्मद सिराज आला. पण त्याचा गेलने यथेच्छ समाचार घेतला. त्याच्या गोलंदाजीवर गेलने तब्बल २४ धावा कुटल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होतो. गेलने या षटकात दुसरा षटकार लागवताच संघाची मालकीण प्रीती झिंटा हिच्यावर कॅमेरा दाखवण्यात आला. त्यावेळी प्रितीने टाळ्या वाजवून आणि सुंदर हास्य करून आपला आनंद व्यक्त केला.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल जोडीने पंजाबच्या डावाची अतिशय आक्रमक सुरुवात करुन दिली होती. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत आपल्या विकेट फेकल्या. यामुळे मधल्या षटकांमध्ये पंजाबची धावगती मंदावली. मात्र ख्रिस गेलने अखेरच्या षटकांमध्ये आपला दाणपट्टा चालवत संघाला 173 धावांचा पल्ला गाठून दिला. बंगळुरुला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी 174 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावांची खेळी केली.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासून बंगळुरुवर हल्ला चढवला. विशेषकरुन ख्रिस गेलने सर्वा गोलंदाजांची धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत गेलने झटपट धावा जमवल्या. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल, सरफराज खान आणि सॅम करन झटपट बाद झाले. यावेळी गेलने स्वतःवर संयम ठेवत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने मनदीप सिंहने त्याला चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांत केलेल्या याच फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने 2, तर मोहम्मद सिराज आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 kxip vs rcb video chris gayle hits 24 runs of 1 over owner preity zinta applauds