IPL 2019 : नाकारलेल्या खेळाडूंनीच पाजलं मुंबईला पराभवाचं पाणी

राजस्थानची मुंबईवर 4 गडी राखून मात

विजयी चौकार लगावल्यानंतर जल्लोष व्यक्त करताना श्रेयस गोपाळ

आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने अखेरीस आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. राजस्थानने मुंबईवर 4 गडी राखून मात केली. मुंबईने विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान राजस्थानने बटलरच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. बटलरने 43 चेंडूत 89 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. श्रेयस गोपाळने विजयी चौकार लगावत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानने मुंबईवर मिळवलेल्या या विजयामुळे एक अनोखा योगायोग जुळून आला आहे.

एकेकाळी मुंबईच्या संघाचा हिस्सा असलेल्या मात्र कालांतराने लिलावात किंवा संघात कायम न राखलेल्या खेळाडूंनीच मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 2018 पासून आतापर्यंत राजस्थानने मुंबईला 3 वेळा हरवलं असून, हे तिन्ही पराभव, मुंबईच्या माजी खेळाडूंनीच केले आहेत. 2018 साली पहिल्या सामन्यात कृष्णप्पा गौथम, दुसऱ्या सामन्यात जोस बटलर तर 2019 साली पहिल्या सामन्यात श्रेयस गोपाळने आपल्या जुन्या संघाच्या हातातला पराभव हिसकावला. 2017 साली हे तिन्ही खेळाडू मुंबई इंडियन्स संघात होते.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंजांचा नेटाने सामना करत दोन्ही फलंदाजांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेचा अडसर दूर केल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. बटलरने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. राजस्थानचा संघ विजयाच्या जवळ आलेला असतानाच, सॅमसन, बटलर, राहुल त्रिपाठी, लिव्हींगस्टोन, स्मिथ हे फलंदाज माघारी परतले. यामुळे राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं होतं. मात्र तळातल्या फलंदाजांनी राजस्थानचा विजय सुनिश्चीत केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 players rejected by mumbai indians beat them in match against rr know this unique coincidence