IPL 2019 : कोलकाताचे सलामीवीर ख्रिल लिन आणि सुनील नरिन यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून मात केली आहे. राजस्थानने दिलेले १४० धावांचे आव्हान कोलकाताने सहज पूर्ण केले. कोलकात्याच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने २ बळी घेतले. या पराभवासह राजस्थान रॉयल्सने पाच पैकी चार सामने गमावले असले, तरी त्यामुळे संघाने घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले.

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागल्याने राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रहाणेने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘पाच सामन्यांपैकी हा एकच सामना आम्ही वाईट पद्धतीने हरलो आहोत. त्यामुळे संघाला हडबडून किंवा घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. जेव्हा तुम्ही सातत्याने पराभूत होता, तेव्हा अतिविचार करण्याचाही धोका असतो. मात्र, हा पराभव म्हणजे सारे काही संपले अशी परिस्थिती आमच्यासाठी नाही. आम्ही कामगिरी उंचावली तर अजूनही आम्ही अपेक्षित कामगिरी पार पाडू. फलंदाजांनी खेळपट्टीवर उभे राहून अंदाज घेऊन धोका पत्करावा, तर गोलंदाजांनी झटपट बळी मिळवावे,’’ असे रहाणेने नमूद केले.

दरम्यान, ख्रिस लिन आणि सुनील नरिन यांच्या फटकेबाजीला अंकुश लावण्याचे सर्व प्रयत्न आजच्या सामन्यात व्यर्थ ठरले. सुनिल नरिन ४७ धावांवर बाद झाला. लिनने आपलं अर्धशतक केलं, मात्र गोपाळने त्याला तात्काळ माघारी धाडलं. यानंतर विजयाची औपचारिकता रॉबीन उथप्पा आणि शुभमन गिल या जोडीने पूर्ण केली. जोफ्रा आर्चरचा अपवाद वगळता राजस्थानच्या सर्व गोलंदाजांना कोलकात्याच्या फलंदाजाच्या फटकेबाजीचा प्रसाद खावा लागला.

त्याआधी,स्टिव्ह स्मिथच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर खेळत असताना १३९ धावांपर्यंत मजल मारली. स्टिव्ह स्मिथचं संयमी अर्धशतक आणि त्याला जोस बटलरने दिलेल्या भक्कम साथीमुळे राजस्थानने हा पल्ला गाठला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कोलकात्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी ठरले. प्रसिध कृष्णाने त्याचा बळी घेतला.

यानंतर जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. जोस बटलर माघारी परतल्यानंतर राहुल त्रिपाठीही हजेरीवीर ठरून माघारी परतला. मात्र स्टिव्ह स्मिथने जोस बटलरच्या साथीने संघाची बाजू लावून धरली. यादरम्यान स्मिथने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने ७३ धावांची खेळी केली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत अखेरच्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. कोलकात्याकडून हॅरी गुर्नेयने २ तर प्रसिध कृष्णाने १ बळी घेतला.