Video : स्टंपला चेंडू लागूनही बेल्स पडल्याच नाहीत; गोलंदाज हैराण

या घटनेनंतर त्या फलंदाजांने केल्या आणखी ३७ धावा

IPL 2019 : कोलकाताचे सलामीवीर ख्रिल लिन आणि सुनील नरिन यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून मात केली आहे. राजस्थानने दिलेले १४० धावांचे आव्हान कोलकाताने सहज पूर्ण केले. कोलकात्याच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने २ बळी घेतले.

ख्रिस लिन आणि सुनील नरिन यांच्या फटकेबाजीला अंकुश लावण्याचे राजस्थानच्या गोलंदाजांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या दोघांनी १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९१ धावांची सलामी दिली. सुनिल नरिन ४७ धावांवर बाद झाला. लिनने आपले अर्धशतक केले, मात्र गोपाळने त्याला तात्काळ माघारी धाडले. पण या सामन्यात कोलकाताच्या लिनला नशिबाची साथ लाभली. तिसऱ्या षटकात धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर चेंडू लिनच्या बॅटला लागून बेल्सला लागला. बेल्सचा लाईटदेखील पेटला. पण नेमकी बेल्स पडलीच नाही, त्यामुळे स्टंपला चेंडू लागूनही लिन नाबाद राहिला.

त्यावेळी लिन १३ धावांवर होता. त्यानंतर लिनने एकूण ५० धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर विजयाची औपचारिकता रॉबीन उथप्पा आणि शुभमन गिल या जोडीने पूर्ण केली. जोफ्रा आर्चरचा अपवाद वगळता राजस्थानच्या सर्व गोलंदाजांना कोलकात्याच्या फलंदाजाच्या फटकेबाजीचा प्रसाद खावा लागला.

त्याआधी,स्टिव्ह स्मिथच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर खेळत असताना १३९ धावांपर्यंत मजल मारली. स्टिव्ह स्मिथचं संयमी अर्धशतक आणि त्याला जोस बटलरने दिलेल्या भक्कम साथीमुळे राजस्थानने हा पल्ला गाठला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कोलकात्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी ठरले. प्रसिध कृष्णाने त्याचा बळी घेतला.

यानंतर जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. जोस बटलर माघारी परतल्यानंतर राहुल त्रिपाठीही हजेरीवीर ठरून माघारी परतला. मात्र स्टिव्ह स्मिथने जोस बटलरच्या साथीने संघाची बाजू लावून धरली. यादरम्यान स्मिथने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने ७३ धावांची खेळी केली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत अखेरच्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. कोलकात्याकडून हॅरी गुर्नेयने २ तर प्रसिध कृष्णाने १ बळी घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 rr vs kkr video of ball hitting the bail of stump but lynn survived on dhawal kulkarni bowling