IPL 2020 च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मानं केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचं हे पाचवं IPL विजेतेपद ठरलं आहे. यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचं कौतुक केलं. “जर आता भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलं नाही तर हे भारताचं दुर्देव असेल,” असं मत गंभीर यानं व्यक्त केलं. दरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याला आता कर्णधार करण्याची वेळ आली असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं.

“जर कोणताही खेळाडू पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? एक कर्णधार तेवढाच चांगला असतो जेवढा त्याचा संघ असतो यात कोणतंही दुमत नाही. परंतु एका कर्णधाराचं कौशल्य ओळखण्याचं कोणतं प्रमाण असतं? कोणत्याही कर्णधाराचं कौशल्य ओळखण्याचं प्रमाण एकच हवं,” असं गंभीर म्हणाला. “जर आज आपण धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणतो जे तो नक्कीच आहे. त्यानं आतापर्यंत दोन वेळा विश्वचषक स्पर्धा आणि दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. याच आधारावर आपण त्याला यशस्वी कर्णधार म्हणतो. रोहित शर्मानंही पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. पुढे जाऊन त्याला जर भारतीय संघाचा कर्णधारपद किंवा टी-२० संघाचं कर्णधारपद मिळालं नाही तर ही निंदनीय बाब ठरेल. यापेक्षा रोहित आणखी जास्त काय करू शकतो?,” असंही तो बोलतान म्हणाला. क्रिकइन्फोसोबत साधलेल्या संवादादरम्यान त्यानं यावर भाष्य केलं.

या चर्चेदरम्यान गंभीरनं निरनिराळ्या प्रारूपांसाठी वेगळ्या कर्णधारांचा पर्यायही सुचवला. “तुम्ही वेगवेगळ्या प्रारूपांसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवू शकता. यात काहीही चुकीचं नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कर्णधार म्हणून किती फरक आहे हे रोहित शर्मानं सिद्ध केलं आहे. एक खेळाडू पाच वेळा विजेतेपद मिळवत आहे आणि दुसरा आतापर्यंत एकदाही जिंकला नाही,” असंही गंभीर म्हणाला. विराट कोहली हा अयोग्य कर्णधार आहे असं बिलकुल म्हणणं नाही. परंतु विराट आणि रोहित यांना एकच मंच मिळाला आहे आणि त्यात रोहितनं स्वत:ला सिद्ध केल्याचंही गंभीरनं सांगितलं.