चेन्नईनं हैदराबादवर विजय मिळवत आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नईनं आयपीएलमध्ये पहिला सामना गमावल्यानंतर सलग पाचवा विजय मिळवला आहे. हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. हे लक्ष्य चेन्नईच्या फलंदाजांनी सहज गाठलं. आघाडीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस जोडीनं चांगली सुरुवात केली. त्यामुळे हा विजय सोपा झाला. ऋतुराज आणि फाफ या दोघांनी अर्धशतकं झळकावली. फाफनं ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. तर ऋतुराजनं ४४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. यात १२ चौकारांचा समावेश आहे.

चेन्नईचा डाव

हैदराबादनं विजयासाठी ठेवललं १७२ धावाचं लक्ष्य गाठताना चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि फाफनं पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. ऋतुराज आणि फाफ या दोघांनी आपली अर्धशतकं झळकावली. फाफनं ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. तर ऋतुराजनं ४४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. यात १२ चौकारांचा समावेश आहे. ऋतुराजला बाद करण्यात राशीद खानला यश आलं.  त्यानंतर टाकलेल्या षटकात राशीद खाननं सलग दोन गडी बाद केले. मोईन अली आणि फाफला बाद केलं.

हैदराबादचा डाव

हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं. हैदराबादने ३ गडी गमवून १७१ धावा केल्या. डेविड वॉर्नर आणि मनिष पांडेच्या धीम्या फलंदाजीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र केन विलियमसननं आक्रमक खेळी करत संघाला १७१ धावांपर्यंत पोहोचवलं. डेविड वॉर्नरनं ५५ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर मनिष पांडेनं ४६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. मात्र धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकत होती. वॉर्नर आणि पांडे बाद झाल्यानंतर केन विलियमसननं मोर्चा सांभाळला. केन विलियमसननं १० चेंडूत २६ धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा मान डेविड वॉर्नरच्या नावावर आहे. चेन्नई विरोधात अर्धशतक झळकावून त्याने स्पर्धेतील ५० वं अर्धशतक केलं. त्याचबरोबर डेविड वॉर्नरचा १० हजार धावा करण्याऱ्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. चेन्नईविरोधात अर्धशतकी खेळी केल्यानंतर त्याच्या १० हजार धावा झाल्या आहेत. टी २० सामन्यात चार खेळाडुंनी आतापर्यंत १० हजारांचा पल्ला गाठला आहे. यात वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आघाडीवर आहे. त्याच्या खेळीत २२ शतकं आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर कायरन पोलार्ड या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. डेविड वॉर्नर चौथा खेळाडू आहे. त्याने १० हजार धावा केल्या आहेत.

दोन्ही संघातील खेळाडू
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडु, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, लुंगी एन्गिडी

सनराइजर्स हैदराबाद- डेविन वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विलियमसन, मनिष पांडे, केदार जाधव, विजय शंकर, राशिद खान, जगदीशा सुचिथ, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, संदीप शर्मा