IPL 2021: कोण होऊ शकतो चॅम्पियन? दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच सेहवाग म्हणाला…

आयपीएल  २०२१ च्या १४व्या मोसमाचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे

Virender Sehwag prediction
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने स्पर्धेच्या विजेतेपदाचा अंदाज वर्तवला

आयपीएल  २०२१ च्या १४व्या मोसमाचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने ही लीग फार महत्त्वाची ठरणार असून, प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लागणार आहे. दरम्यान, दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने स्पर्धेच्या विजेतेपदाचा अंदाज वर्तवला आहे.

वीरेंद्र सेहवागने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “आयपीएलचा दुसरा टप्पा दुबई आणि अबू धाबीमध्ये हलवण्यात आला आहे (शारजाहमध्ये काही सामनेही होणार आहेत), मला वाटते की दिल्ली आणि मुंबई पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीचे दावेदार असतील. पाच वेळचा चॅम्पियन राहीलेला मुंबई संघ थोडा पुढे आहे. पहिल्या टप्प्यात भारतात चेन्नईची सरासरी धावसंख्या २०१ होती, पण मला वाटते की संयुक्त अरब अमिरातीतील खेळपट्ट्यांच्या बाबतीत त्यांच्या फलंदाजीवर परिणाम होईल. जर मला एक संघ निवडायचा असेल तर तो संघ मुंबई असेल.”

विश्वचषकासाठी निवड झालेल्या टीममध्ये होऊ शकतात बदल 

सेहवाग आयपीएलमध्येही खेळला आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) चे कर्णधारपद सांभाळले होते. पण या संघाला चॅम्पियन बनण्याचे सौभाग्य अजून लाभले नाही. मात्र गेल्या हंगामात हा संघ उपविजेता ठरला होता. वीरूने असेही सांगितले की, “काही खेळाडू आयपीएलच्या माध्यमातून टी -२० विश्वचषकासाठी भारतीय निवडकर्त्यांना प्रभावित करू शकतात. १५ सदस्यीय भारतीय संघाची टी -२० विश्वचषकासाठी निवड झाली असली तरी त्यात बदल केले जाऊ शकतात”

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अर्ध्यावरचा डाव सुरू!

मुंबई इंडियन्स  सहा ताऱ्यांवर लक्ष

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर या सहा जणांची ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने आपसूकच त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय ट्रेंट बोल्ट, किरॉन पोलार्ड आणि क्विंटन डीकॉक या विदेशी त्रिकुटाने मुंबईसाठी सातत्याने योगदान दिले आहे. मुंबईने सुरुवातीपासूनच जम बसवल्यास यंदा सलग तिसऱ्यांदा चषक उंचावण्यापासून त्यांना रोखणे कठीण जाईल.

IPL 2021 CSK vs MI: सचिन तेंडुलकर युएईमध्ये दाखल; चेन्नईला भिडण्यासाठी मुंबई सज्ज

 चेन्नई सुपर किंग्ज  वचपा घेण्यासाठी सज्ज

‘आयपीएल’ स्थगित होण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या लढतीत मुंबईनेच २१९ धावांचे लक्ष्य गाठून चेन्नईला धूळ चारली होती. त्या पराभवानंतरही महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत मुंबईपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू सॅम करन विलगीकरणामुळे या लढतीला मुकण्याची शक्यता असली, तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप पाडणारा शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि दीपक चहर असे पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे चेन्नईला गतपराभवाचा वचपा काढून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्याची संधी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 champion mumbai indians and chennai super kings virender sehwag prediction srk